Bhagat Singh Koshyari : राज्यपालांचे पदमुक्तीचे संकेत, काँग्रेस भाजपसह सर्व पक्षीय नेते म्हणतात....
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना त्यांनी त्याबाबत पत्र लिहिलं आहे.
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपालांच्या या मागणीनंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत काँग्रेसची भूमिका आधीपासूनच स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. "सातत्याने महापुरूषांचा आणि संविधानिक व्यवस्थेचा अपमान करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. राज्यपाल भवन हे भाजप भवन झालं होतं असं चित्र दिसत होतं. राष्ट्रपतींकडे देखील आम्ही लेखी तक्रारी केल्या होत्या. परंतु, भाजपलाच त्यांची भूमिका अपेक्षित होती की काय असं वाटतंय. कारण अनेक वेळा लेखी मागणी करून देखील त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. राज्यपाल हे उद्या जाण्याऐवजी आजच जावेत अशी आमची मागणी आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केलीय. "राज्यपालांनी थोर महापुरुषांचा सातत्याने केलेल्या अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपाची भावना दिसते. महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? जाहीर निषेध!," असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका केली आहे.
१/२ राज्यपालांनी थोर महापुरुषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही pic.twitter.com/4XjiVhilmp
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 23, 2023
"राज्यपालांकडून महाराष्ट्रातील महापुरूषांचा अपमान करून झाला आहे. त्यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील जनतेची त्यांना हटवण्यात यावे अशी मागणी होती. ते जेवढ्या लवकर राज्यातून जातील तेवढ्या लवकर महाराष्ट्र सुटकेचा नि:श्वास सोडेल, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
"राज्यपालांनी पंतप्रधानांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. उशिरा का होईना त्यांना सद्बुद्धी सुचली. आज त्यांनी माध्यमांना निवेदन दिले याचा अर्थ या आधीच त्यांनी केंद्र सरकारकडे मुक्त होण्याची विनंती केली असावी. राज्यपालांनी महाराष्ट्राचा वेळोवेळी अपमान केला, त्यांनी घटनात्मक अधिकार राबवले, मात्र घटनात्मक कर्तव्यातून ते चुकले. बारा आमदारांची नियुक्ती त्यांनी करायची होती, मात्र ती केली नाही. छत्रपती शिवरायांचा त्यांनी वारंवार अपमान केला. घटनात्मक पदावर असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं का असा प्रश्न विचारला. घटनात्मक पदाची त्यांनी गनिमा घालवली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत त्यांनी आवमानात्मक वक्तव्य केलं. मुंबईतील मराठी माणसाचा तर त्यांनी खूपच मोठा उपमर्द केला. त्यांचा हा उद्योग काही पक्षाच्या नेत्यांना पाहिजे होता म्हणून ते करून घेताना त्यांना जबाबदारीतून मुक्त केलं जात नव्हतं, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर दाधव यांनी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी देखील या मुद्यावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. "हा निर्णय त्यांनी आधीच घ्यायला पाहिजे होता. त्यांनी वेळोवेळी महापुरूषांचा अपमान केला, मराठी माणसाचा अपमान केला. अशा राज्यपालांना सरकारने स्वत:हून बोलावून घेतले पाहिजे होते. परंतु, तसे झाले नाही. महाराष्ट्राला सतत पाण्यात पाहणाऱ्या राज्यपालांना आता उशिरा का होईना उपरती झाली ही चांगली गोष्ट आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारावा असे मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, "राज्यपाल हे मोठे पद आहे, मात्र या पदावर बसून महाराष्ट्र शांत ठेवण्या ऐवजी अस्थिर ठेवण्यात या राज्यपालांचा हातखंडा होता. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेक वेळा वाद उद्भवला. त्यामुळे त्यांनी स्वतःहून कार्यमुक्त करण्याची केलेली मागणी म्हणजे 'देर आये, दुरुस्त आये' अशीच आहे. मात्र जरी उशिरा त्यांना शहाणपण सुचलं असलं तरी ती आनंदाची बाब आहे. आता येणाऱ्या राज्यपालांनी त्या पदाची गरीमा राखावी अशी, असे रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत राजीनामा पत्राबाबत माहिती नाही. परंतु, राजभवनकडून व्हाट्सअॅपवरून पाठवलेलं परिपत्रक पाहिल्याचे म्हटले आहे. "या परिपत्रकात राज्यपालांनी येथून पुढचा काळ हा मनन आणि चिंतनासाठी घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. देशातील अनेक नेते कितीही वय झालं तरी खुर्ची आणि पद सोडायला तयार नसतात. परंतु, राज्यपालांनी स्वत:हून पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. हे इतर नेत्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे, असे मंत्री मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या