'कारणं सांगू नका, माझ्या गतीनं कामं करा', अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना झापलं
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखले जातात. आज बारामतीमध्ये अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा या गोष्टीचा प्रत्यय आला.
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखले जातात. आज अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा या गोष्टीचा प्रत्यय आला. आज अजित पवारांनी बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. सकाळी झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असं अजित पवार पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांना म्हणाले.
यावेळी पेट्रोल पंपाच्या परवानगीच्या कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितलं. यावेळी अजित पवारांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा बँक चालवण्याचा अधिकार केंद्र सरकारने जवळपास काढून घेतला
जिल्हा बँकेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने जिल्हा सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्याच्या विरोधात राज्य सरकार कोर्टात जाणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. जिल्हा बँक चालवण्याचा अधिकार केंद्र सरकारने जवळपास काढून घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकार कोर्टात जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. आम्ही चांगल्या पद्धतीने बँक चालवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या पाच बँकांमध्ये सातारा आणि पुणे जिल्हा बँक आहे. आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात यावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. त्याच्या विरोधात आम्ही चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढं कसं जायच याचा विचार करीत आहोत, असं ते म्हणाले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. यावर बोलतानाही अजित पवारांनी फिरकी घेतली. आपण त्या पदावर असून पण चिन्ह मिळत नसेल तर मग अवघड आहे असं गंमतीने अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आपल्याला कोणतं चिन्ह मिळणार यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी कपबशी हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे चिन्ह असेल असं अजित पवार म्हणाले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अद्याप पर्यंत चिन्ह मिळालं नाही असं सांगितलं. त्यावर अजित पवार म्हणाले जर आपण पदावर असून पण चिन्ह मिळत नसेल तर अवघड आहे. आपल्याला कपबशीचे चिन्ह मिळेल असं म्हणताच एकच हशा पिकला.