Dam Water Storage:पावसाचा जोर वाढला, 'सीना' धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो, राधानगरीसह जायकवाडीत किती पाणी वाढलं?
लवकर हजेरी लावलेल्या मान्सूनमुळे राज्यातील धरण साठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे .

Dam Water Storage: राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे .कमी क्षेत्रावर अधिक पाऊस पडत असल्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे . पेरणीयोग्य पावसामुळे सध्या शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू असून खरिपाच्या पेरण्यांना काही ठिकाणी सुरुवातही झाली आहे .दरम्यान राज्यभरातील धरण साठ्याची स्थिती काय ? कोणत्या धरणात किती पाणीसाठा आहे ? पाहुया .
गेल्या काही दिवसांपासून कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्रातील पुणे विभागातही तुफान पावसाने हजेरी लावली . अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणारे सीना धरण जूनमध्येच ओवर फ्लो झाले आहे . मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस त्यानंतर थोड्याफार प्रमाणात झालेला वळवाचा पाऊस आणि आता लवकर हजेरी लावलेल्या मान्सूनमुळे राज्यातील धरण साठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे . नागपूर अमरावती मराठवाडा नाशिक पुणे आणि कोकण विभागात लहान मोठ्या धरणांमध्ये सरासरी 30.92% उपयुक्त जलसाठा आहे .
कोणत्या विभागात किती पाणीसाठा ?
नागपूर :32.40% (गतवर्षी 36.59% )
अमरावती :39.36% (गतवर्षी 36.83% )
छत्रपती संभाजीनगर :30.78% (गतवर्षी 9.32% )
नाशिक :31.05% (गतवर्षी 22.79% )
पुणे : 27.74% (गेल्या वर्षी 12.99% )
कोकण :36.62% (गतवर्षी 29.26% )
राधानगरी 48.11 टक्क्यांवर, वारणा उजनी कुठवर ?
कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून तुफान पावसाने हजेरी लावली आहे .धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस होत असल्याने कोल्हापुरातील राधानगरी धरणात 48.11% पाणीसाठा झालाय .दूधगंगा धरणात 16.10% पाणी आहे .सांगलीतील वारणा धरण 25.45 टक्क्यांवर असून साताऱ्यातलं कोयना 16.98 टक्क्यांवर आहे .सोलापुरातील उजनी धरण 44.31 टक्क्यांवर असल्याचं जलसंपदा विभागाने सांगितले .पुण्यातील भाटघर धरण सध्या 7.61 टक्क्यांवर असून खडकवासला धरणात 46.97% पाणी आहे .पानशेत धरण 13.42 टक्क्यांनी भरले आहे .डिंभे धरणात 12.16% जलसाठा शिल्लक आहे .
जायकवाडीत समाधानकारक स्थिती,उर्वरित मराठवाड्यात ....
मराठवाड्यात मान्सूनची सध्या चांगली हजेरी लागली आहे .बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून पेरणी योग्य पाऊस पडत असल्याचे चित्र आहे .मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण सध्या 29.76 टक्क्यांनी भरले आहे .गेल्या वर्षी याच सुमारास जायकवाडीत 5.65% पाणीसाठा होता .त्यामुळे यंदा अजून महिन्याच्या मध्यावर जायकवाडीत समाधानकारक स्थिती असल्याचे सांगितले जातात आहे .
बीड मधील मांजरा धरण 27.72 टक्क्यांनी भरले आहे .तर माजलगाव धरणात 11.85% पाणीसाठा आहे .या दोन्ही धरणात गेल्यावर्षी याच सुमारास जलसाठा शून्यावर गेला होता .हिंगोलीच्या सिद्धेश्वर आणि येलदरी धरणामध्ये 19.49% व 50 टक्के अनुक्रमे पाणिसाठा आहे .नांदेडच्या विष्णुपुरी धरणात 23.68% पाणी तर धाराशिवच्या सीना कोरेगाव मध्ये 19.85 व निम्न तेरणामध्ये 70.18% पाणीसाठा आहे . परभणीचं निम्न दुधनाधरण 37.05 टक्क्यांनी भरले आहे .गेल्यावर्षी याच सुमारास हे धरणही शून्यावर होते .























