(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jitendra Navlani : जितेंद्र नवलानीवर गुन्हा दाखल; कोट्यवधी रुपये वसुलीचा गैरकारभार केल्याचं ACB च्या तपासात निष्पन्न
Jitendra Navlani : ईडी अधिकाऱ्यांच्या नावाने विविध खासगी कंपन्यांकडून 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये उकळले आणि ती रोकड 'व्हाईट' केल्याचे अॅण्टी करप्शन ब्युरोच्या तपासात निष्पन्न
Jitendra Navlani : जितेंद्र नवलानी याने ईडी अधिकाऱ्यांच्या नावाने विविध खासगी कंपन्यांकडून 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये उकळले आणि स्वत:च्या कंपन्यांच्या माध्यमातून ती रोकड 'व्हाईट' केल्याचे अॅण्टी करप्शन ब्युरोच्या तपासात निष्पन्न झाल्याने जितेंद्र नवलानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये उकळले
ईडीचा दलाल असलेल्या जितेंद्र नवलानी याच्या विरोधात अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने अॅण्टी करप्शन ब्युरोने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये जितेंद्र नवलानी व अन्य यांनी विविध खासगी कंपन्यांकडून इडी अधिकाऱ्यांच्या नावाने सन 2015 ते 2021 या कालावधीमध्ये 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये उकळले. तसेच या रकमा त्याने स्वतःच्या तसेच त्यांचे मालकी व नियंत्रणाखाली असलेल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून 'अनसिक्युरर्ड लोन व कन्सल्टन्सी फी' च्या स्वरुपात 'व्हाईट' करुन घेतल्या.
गुन्हा दाखल
ईडी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यापासून परावृत्त करतो, असे खोटेनाटे सांगून जितेंद्र नवलानी याने अनेक खासगी कंपन्यांना चूना लावला आणि कोट्यवधी रूपये वसूल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अॅण्टी करप्शन ब्युरोने इडीच्या नावाने दलाली करणारा जितेंद्र नवलानी तसेच त्याच्या अन्य लोकांविरोधात कलम 8 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिकनयम 1988 व कलम 7 अ, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवलानींचा मनी लाँड्रिंग गुन्ह्यातही थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप
शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नवलानीचं नाव घेतलं होतं. संजय राऊत यांनी ईडीचे अधिकारी हे परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय जितेंद्र नवलानींच्या माध्यमातून खंडणीचं रॅकेट चालवतात. तसेच नवलानींचा मनी लाँड्रिंग गुन्ह्यातही थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याची दखल घेत एसआयटीकडून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली.