Maharashtra Corona Crisis: उद्याऐवजी सोमवारपासून दुकान सुरु करणार, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय
दुकानं बंद केल्याच्या विरोधात राज्यभर व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. उद्या 9 तारखेपासून दुकानं उघडण्याचा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 9 तारखेला दुकान सुरु करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू असं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं सांगितलं आहे.
मुंबई : 'ब्रेक द चेन'नंतर राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं देखील बंद करण्यात आली आहेत. या निर्णयाविरोधात राज्यभर व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. तसेच उद्या 9 तारखेपासून दुकानं उघडण्याचा इशारा दिला होता. मात्र या निर्णयात बदल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. मुख्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असून 2 दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यांच्या आश्वासनानुसार 9 तारखेला दुकान सुरु करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड ॲग्रिकल्चर तर्फे आज "ब्रेक द चेन व व्यापार बंद" या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली. सुरुवातीला संतोष मंडलेचा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 दिवस वाट बघावी असे सांगितले आहे. याबाबत आपण सर्वांनी मते मांडावी असे सांगितले.
सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र नियम पाळण्यात सहकार्य हवे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ललित गांधी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून गेल्या 4 दिवस सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. तसेच सरकारशी संपर्क करून आहोत. सर्वांच्या भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा आढावा घेतला. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या ब्रेक द चेन विषयावर सरकारच्या निर्णयाची 2 दिवस वाट बघावी असे मत मांडली.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे
राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही केले होते.