(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Cases: राज्यात आज 6695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7120 रुग्ण कोरोनामुक्त
भिवंडी निजामपूर, मालेगाव, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार, हिंगोली, परभणी, अकोला महानगरपालिका, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या अकरा महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत
मुंबई : राज्यात आज 6695 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.
राज्यात आज कोरोनामुळे 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 34 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74 हजार 995 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (10), हिंगोली (76), अमरावती (87), वाशिम (94), गोंदिया (95), गडचिरोली (31) या सात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 974अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भिवंडी निजामपूर महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार, हिंगोली, परभणी, अकोला महानगरपालिका, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या अकरा महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,89,62,106 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,36,220 (12.94 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,46,501 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,776 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 324 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 324 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 315 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,13,476 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4529 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1591 दिवसांवर गेला आहे.
24 तासांत 42,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
गेल्या 24 तासांत 42,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 533 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अनेक राज्यांत कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून केरळात प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. केरळात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 22,414 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 41,726 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.