शिखर बँक घोटाळा | एक पैशाचा घोटाळा केला नाही, अजित पवारांनी आरोप फेटाळले
राज्य शिखर बँक एका पक्षाची बँक नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, शेकाप सगळ्या पक्षांचे नेते त्यात होते. आम्ही भ्रष्ट्राचार केला नाही, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळले आहेत. मी एक पैशाचा घोटाळा केला नाही. पवार साहेबांचा या सर्वाशी काहीच संबंध नाही. शरद पवार तर संचालक मंडळावरही नव्हते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्य शिखर बँकेत कोणताही भ्रष्टाचार केला नाही. शंका असल्यास प्रकरणाची वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत चौकशी करावी. बँकेचा व्यवहार 12 हजार कोटीच्या ठेवी असताना गैरव्यवहार 25 हजार कोटीचा कसा झाला? असा सवालही अजित पवारांनी यावेळी विचारला. आज राज्य शिखर बँक 250 ते 300 कोटींच्या नफ्यात आहे. जर बँक चांगली चालली नसती तर नफा मिळवला नसता, असंही अजित पवारांनी म्हटलं.
अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून पॅकेज दिली जातात, बँकेकडून कर्ज दिले जाते. या संस्था टिकाव्या म्हणून हे करावं लागतं. कर्ज देताना संचालक देत नाहीत, त्यासाठी लोक नेमलेली असतात ते कागदपत्र तपासतात, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने आमचं म्हणणं मांडायला संधी न देता एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली. जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आम्हाला द्यावी लागतील, ती आम्ही द्यायला तयार आहोत, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली. शरद पवारांचा संबंध नसताना त्यांचे नाव कसं घेण्यात आलं ते कळण्याचा मार्ग नाही. पवार साहेब संचालक नाहीत, सभासद नाही तरी त्यांचे नाव गोवण्यात आलं असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य शिखर बँक एका पक्षाची बँक नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, शेकाप सगळ्या पक्षांचे नेते त्यात होते. सर्वसामान्यांच्या मनात हे ऐकल्यानंतर शंका येते पण मी सांगू इच्छितो यात आम्ही भ्रष्ट्राचार केला नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. मी लोन कमिटीच्या बैठकीला हजर नसायचो. संचालक मंडळाच्या बैठकीला हजर असायचो. मात्र माझ्यावर इतर अनेक जबाबदाऱ्या होत्या. कुठलीही चौकशी करा, एक पैसा आम्ही घेतलेला नाही, असं अजित पवारांनी ठामपणे सांगितलं.
- शिखर बँक घोटाळा | बारामती बंदची हाक, पवार साहेबांवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा बारामतीकरांचा आरोप
- 'मी कुठल्याच बँकेचा संचालक नव्हतो, गुन्हा दाखल झाल्यास स्वागत'-शरद पवार
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा कर्ज वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. या निर्देशांनुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 25 हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह 70 मोठ्या नेत्यांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता आरोपींचा आकडा 300च्या घरात जाण्याची शक्यता देखील तक्रारदारांच्या वकिलांनी वर्तवलीय.
EXPLAINER VIDEO | शिखर बॅंक घोटाळा आणि महाराष्ट्राचं राजकारण | बातमीच्या पलीकडे | ABP Majha महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला तब्बल 1 हजार 500 कोटींचा फटका
- संचालक मंडळाकडून नाबार्डच्या सूचनांचं उल्लघंन केल्याचा आरोप
- 9 साखर कारखान्यांना 331 कोटींना कर्जपुरवठा
- गिरणा, सिंदखेडा करखाना, सूतगिरण्यांना 60 कोटींचं कर्ज
- केन अग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं 119 कोटींचा तोटा
- 24 साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, 225 कोटींची थकबाकी
- 22 कारखान्यांकडील 1995 कोटींचं कर्ज असुरक्षित
- लघुउद्योगाला दिलेल्या सव्वा तीन कोटींचं नुकसान
- कर्जवसुलासाठी मालमत्ता विक्रि करुनही 478 कोटींची थकबाकी
- खासगी पद्धतीने मालमत्ता विक्रि, 37 कोटींचं नुकसान
- 8 थकवाकीदारांच्या मालमत्ता विक्रित 6 कोटी 12 लाखांता तोटा
कोणावर कितीची जबाबदारी
- शिवाजीराव नलावडे 34 कोटी
- राजवर्धन कदमबांडे 25
- बाळासाहेब सरनाईक 24 कोटी
- अजित पवार 24 कोटी
- दिलीपराव देशमुख 23 कोटी
- जयंत पाटील 22 कोटी
- तुकाराम दिघोळे 22 कोटी
- मधुकरराव चव्हाण 21 कोटी
- आनंदराव आडसूळ 21 कोटी
- प्रसाद तनपूरे 20 कोटी
- जगन्नाथ पाटील 20 कोटी
- गंगाधर कुटुंरकर 20 कोटी
- मदन पाटील 18 कोटी
- जयवंतराव आवळे 17 कोटी
- राजेंद्र शिंगणे 17 कोटी
- मिनाक्षी पाटील 12 कोटी
- राहुल मोटे 4 कोटी
- रजनीताई पाटील 4 कोटी