Kunal Raut : वेळ पडली तर गिरीश महाजनांच्या गाडीपुढे आडवे व्हा, भाजपा कार्यालय फोडा; कुणाल राऊत यांचा अजब सल्ला
Kunal Raut : लोकांना जर आपल्यासोबत घ्यायचे असेल तर त्यांच्या कामासाठी युवकांनी आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे, असे मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी व्यक्त केले.
Kunal Raut : राज्यात काँग्रेस पक्षाची (Congress) जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला आपणच जबाबदार असल्याचे वक्तव्य माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी केलं. लोकांना जर आपल्यासोबत घ्यायचे असेल तर त्यांच्या कामासाठी युवकांनी आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे. त्यासाठी वेळ पडली तर मंत्री गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) गाडीपुढे आडवे व्हा, वेळ पडली तर भाजपा (BJP) कार्यालय फोडा. लाठ्या काठ्या खा, जेलमध्ये जा तरच लोक तुमच्या मागे धावतील अशा प्रकारचा अजब सल्ला कुणाल राऊत यांनी दिला आहे. ते जळगावमध्ये (Jalgaon) युवक काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
रस्त्यावर उतरुन कामे करा, तर लोक तुम्हाला साथ देतील
कुणाल राऊत यांनी आपली परखड भूमिका मांडताना काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीवर जोरदार टीका केली. काँगेस पक्षाच्या मागे लोक नाहीत असं चित्र निर्माण झाले आहे. त्याला कारण आपणच आपल्या कामात कमी पडलो आहोत. आपल्या मागे लोक पाहिजे असतील तर आता लोकांच्या कामासाठी आपल्याला आक्रमक भूमिका घेणं गरजेचं असल्याचे राऊत म्हणाले. त्यासाठी आपल्यात वाद करु नका, लोकांमध्ये जा, लोकांची कामे करा असेही राऊत म्हणाले. कामे केली तर लोक तुमच्या मागे येतील. त्यासाठी लोकांच्या कामाला प्राधान्य द्यायला हवं असे कुणाल राऊत म्हणाले. रेल्वे गाड्या थांबायच्या असतील तर त्या थांबवा, मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवा, तिच्यासमोर आडवे व्हा. लाठ्या काठ्या अंगावर घ्या, तुमचे हात तुटो, पाय तुटो, जेल जा, वेळ पडलीच तर भाजपचे कार्यालय फोडा, रस्त्यावर उतरुन कामे करा, तर लोक तुम्हाला साथ देतील. तुम्ही हिरो झाल्याशिवाय लोक तुमच्या मागे येणार नाहीत असा अजब सल्ला कुणाला राऊत यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेणं गरजेचं
कुणाल राऊत यांनी अंतर्गत गटाबाजीवर देखील वक्तव्य केलं. पक्षात अंतर्गत वाद होता कामा नयेत. आपल्या कामात आपणच कमी पडलो असल्याचे राऊत म्हणाले. तुम्ही लोकांमध्ये जा, त्यांच्या अडचणी सोडवा लोक आपोआप तुमच्या मागे येतील असेही राऊत म्हणाले. आतापर्यंत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी आंदोलने केली आहेत. दिल्लीत जाऊनसुद्धा रेल्वे रोको आंदोलन केल्याचे राऊत यांनी सांगितले. येणाऱ्या काळातसुद्धा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेणं गरजेचं आहे. गिरीश महाजन असो नाहीतर कोणीही असो त्यांची गाड्या अडवल्या पाहिजेत असे कुणाल राऊत म्हणाले.
कोण आहेत कुणाल राऊत?
कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र असून त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1989 रोजी झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरु केला. एनएसयूआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
महत्त्वाच्या बातम्या: