Maharashtra Weather : पारा घसरला, गारठा वाढला; नाताळानंतर मुंबईसह राज्यात थंडी आणखी वाढणार
Maharashtra Weather : राज्यात गारठा वाढला (Cold Weather) आहे. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत.
Maharashtra Weather News : मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात किमान तापमानात (Minimum Temperature) घट झाली आहे. त्यामुळं राज्यात गारठा वाढला (Cold Weather) आहे. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत. दरम्यान, नाताळनंतर मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात (Maharashtra) तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं आणखी हुडहुडी वाढणार आहे. सध्या मुंबईमध्ये (Mumbai)तापमानात चांगलीच घट झाली आहे. मुंबईचं तापमान 24 अंश सेल्सिअसवरुन वरुन 19 अंशावर आलं आहे. त्यामुळं मुंबईतही थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट
उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून थंडीची लाट कायम आहे. थंडीचा परिणाम मानवी जनजीवनावर दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यातही गारठा चांगलाच वाढला आहे. थंडीचा परिणाम प्राण्यांवर देखील दिसून येत आहे. नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजारात 1 हजार 700 घोडे आहेत. वाढत्या थंडीत घोड्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. घोड्यांचे थंडी पासून रक्षण करण्यासाठी विशेष अशा उबदार कपड्यांची झुल त्यांच्या अंगावर टाकून शरीरातील तापमान कायम ठेवले जात आहे.
काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. सध्या राज्यातील मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भ (Vidarbha) आणि पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra) चांगलाच गारठला आहे. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आल्यानं हुडहुडी चांगलीच वाढली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. ख्रिसमसनंतर म्हणजे 25 डिसेंबरनंतर मुंबईत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. औरंगाबादमध्ये किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. त्यामुळं तिथे चांगलीच हुडहुडी वाढली आहे. तिथे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडं पुण्यात 11.05 अंश सेल्सिएस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपुरात 12.09 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत 19.06 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हळूहळू थंडी वाढणार
राज्यात थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम वातावरणावर झाला होता. या चक्रीवादळामुळं राज्यात थंडी कमी झाली होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं होतं. तसेच काही ठिकाणी पाऊस देखील पडला होता. आता मात्र, मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात थंडी जाणवू लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: