Solapur Weather : सोलापुरात तापमानाचा पारा 40 अंशांवर; उष्माघातपासून वाचण्यासाठी नागरिकांना आरोग्य विभागाचे आवाहन
Solapur Weather News : सोलापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा (Temperature) पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.

Solapur Weather News : सोलापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा (Temperature) पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. बाहेर पडणारे नागरिक स्कार्फ, टोपी, गॉगल आणि रुमालाचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं असताना आगामी काळात उन्हाच्या झळा आणखी तापण्याची चिन्ह आहेत. एकंदरीत सध्याचं तापमान पाहता सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडून उष्माघातपासून वाचण्यासाठी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.
सध्या सोलापूरमध्ये सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागतोय. तर दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असल्याने वाहनचालक, कामगार, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक ठिकाणी नागरिक डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घालून तसेच चेहरा झाकून बाहेर पडताना दिसत आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने थंड पेयांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक ताक, लिंबूपाणी, फळांचे रस तसेच थंड पेयांचा आधार घेत असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.
Solapur Weather : दुपारच्या वेळेत अनावश्यकपणे बाहेर पडणे टाळा
दरम्यान, डॉक्टरांनीही नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यकपणे बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे, असा सल्ला दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले.
काय करावे
-तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
-हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावे.
-बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चप्पलाचा वापर करण्यात यावा.
-प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
-उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी, स्कार्फ, टॉवेल वापर करण्यात यावा.
-शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.
-अशक्तपणा, सुस्तीपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उष्ण लागण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
-पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
-घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
-विविध शासकीय व खाजगी संस्थांनी कामाच्या ठिकाणी जवळ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
-गर्भवती महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
-उष्माघाताचे लक्षण दिसताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
काय करू नये
-लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
-दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
-गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
-बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
-उन्हाळ्याच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराचे दरवाजे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
-उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये, मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेऊ नये. त्यामुळं डिहायड्रेशन होते.
-उन्हात वाहन शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे.























