(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra CM: गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात भाजपचं धक्कातंत्र? पुण्यातील खासदाराला मुख्यमंत्रीपद मिळणार?
Maharashtra CM: गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप धक्कातंत्र वापरणार का? अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. कारण मुख्यमंत्रीपदासाठी अचानक पुण्यातील खासदारांचं नाव समोर येतंय.
Maharashtra CM: राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले, त्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.. भाजपला 132 जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री होणार असं पक्षश्रेष्ठींकडून निश्चित झालेलं असताना आता शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे. अशात आता मुख्यमंत्रीपदासाठी अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या नावाची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू असल्याचं दिसतंय. खासदारकीवरून थेट मुख्यमंत्री अशी पुन्हा लॉटरी लागणार अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येऊ लागल्या होत्या. अशात मुरलीधर मोहोळांनी मात्र या बातमीचं खंडन करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय.
खासदार झाल्याचा आनंद अजूनही कायम असतानाच आणखी एक धक्का?
पुणे लोकसभा मतदार संघातून प्रचंड मतांनी निवडून आलेले मुरलीधर मोहोळ हे नवनिर्वाचित खासदार आहेत. पहिल्यांदाच खासदार झाल्याचा आनंद अजूनही कायम असताना त्यात आणखी एक धक्का बसला आहे. आधी पुणे लोकसभा मतदार संघातून मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी मोहोळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. अखेर मोहोळ यांनी धंगेकरांचा लाखभर मतांनी पराभव केल्याचं पाहायला मिळालं. मोहोळ पुण्याचे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. मोहोळ यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळाली. मोदी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथही घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू असल्याचं दिसतंय. ज्याबाबत नेटकऱ्यांच्याही जोरदार कमेंट येत आहेत.
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 29, 2024
आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
आमच्या…
खासदारकीवरून थेट मुख्यमंत्री? मोहोळांना पुन्हा लॉटरी?
मुरलीधर मोहोळांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय, ज्यात त्यांनी म्हटलंय, "समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे."
एकूण 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार
विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय मिळाल्यानंतर आता महायुतीने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत महायुती सरकारचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीच रचना असणार आहे. तर या तिघांसोबत एकूण 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे.
कोणते खाते कोणाच्या वाट्याला जाणार? हे अद्यापही गुलदस्त्यातच
सत्तावाटपात भाजपला सर्वाधिक 20, शिवसेनेला 12 ते 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 मंत्रिपदे देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांचे प्रत्यक्षात किती मंत्री शपथ घेणार, हे बघावे लागेल. उर्वरित मंत्रीपदांचा कोटा हा नंतरच्या विस्तारासाठी बाकी ठेवला जाऊ शकतो. आता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावेळी भाजपचे 13 ते 14 मंत्रीपदं शपथ घेऊ शकतात. तर शिंदे गटाचे 12 ते 13 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 9 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती आहे. कोणते खाते कोणाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
हेही वाचा>
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी