(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंद्रपुरात ताफा थांबवत मुख्यमंत्री ठाकरेंनी केली शेतकऱ्यांशी चर्चा
चंद्रपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताफा थांबवत शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र यावेळी मुख्यमंत्री ठाकरे गाडी थांबवून खाली उतरले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
चंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला ताफा थांबवत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे गाडी थांबवून खाली उतरले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. 15 वर्ष झाली तरी शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. 31हजार कोटी रुपये खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ठाकरे यांनी गाडीतून खाली उतरून निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अचानक ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्याने पोलीस आणि प्रशासनाची कार्यक्रमस्थळी प्रचंड तारांबळ उडाली.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने सिंचन योजना पूर्ण होण्याचा बळावला विश्वास चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालवा स्थळाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणातून जे पाणी चंद्रपूरच्या वाट्याला येणार आहे त्यातील घोडाझरी कालव्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. विविध कंत्राटदारांनी थातूरमातूर कामं करून हा प्रकल्प थंडबस्त्यात टाकला होते. महाविकास आघाडी सरकारने या कामाला आता गती देण्याचे निश्चित केले असून नागभीड तालुक्यातील या घोडाझरी कालवा स्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे बाजूच्याच खुल्या मैदानावर हेलिकॉप्टरद्वारे पोहोचले.
प्रत्यक्ष कालवा स्थळी पोहोचून त्यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण योजनेची माहिती घेतली. हा घोडाझरी भूमिगत कालवा असून सुमारे 55 किलोमीटर लांब भूमिगत वाहिन्याद्वारे पाणी शेतीला पोहोचविले जाणार आहे. मुख्यत्वे वनकायद्याचा अडसर असल्याने हे काम पूर्णत्वास जात नव्हते. कालवा स्थळाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
गेली अनेक वर्षे गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. राष्ट्रीय प्रकल्प घोषित झाल्यानंतरही यात कुठलाही विशेष बदल झालेला नाही. त्यामुळेच शेतीला पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेला हा दौरा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे. दरम्यान हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या प्राधान्यक्रमाचा मुद्दा असून पुढल्या 4 वर्षात यासाठी 5 हजार कोटी रुपयांची गरज आहे. या भागाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता यात असल्याची प्रतिक्रिया दौऱ्यात सहभागी असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
भंडाऱ्यात शेतकऱ्यांची निराशा भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणाची पाहणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी प्रकल्पाची पाहणी करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद न केल्याने शेतकरी नाराज झाले. गोसीखुर्द धरणाला आज 33 वर्ष पूर्ण झाले असून अद्यापही धरण पूर्णत्वास गेलेलं नाही. 33 वर्षात अनेक सरकारं आली अन् गेली मात्र प्रकल्प पू्र्ण झाला नाही.