Maharashtra Cabinet : महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही फायनल; राजभवनवर लगबग
Maharashtra Cabinet Expansion : शिवसेना शिंदे गटाला नगरविकास खाते देण्यात भाजपची तयारी असल्याची माहिती आहे. त्याचवेळी पर्यावरण खातं भाजप स्वतःकडे ठेऊन शिवसेनेला पर्यटन खातं देणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधीच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता किंवा सायंकाळी 4 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून उद्या नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 12 आणि भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे.
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल अशी चर्चा होती. पण आता शनिवारी हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. राजभवनावर त्याची तयारी सुरू आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
Shiv Sena Ministers List : शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून त्यामध्ये 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री असणार आहेत. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिघांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून खालील मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे,
- उदय सामंत
- शंभूराजे देसाई
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- प्रताप सरनाईक
- संजय शिरसाठ
- भरत गोगावले
- आशिष जयस्वाल
राज्यमंत्री
- योगेश कदम
- विजय शिवतारे
- प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर
नगरविकास खातं एकनाथ शिंदेंना मिळणार
सुरुवातीपासून गृहखाते आणि नगरविकास खात्यासाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेला आता नगरविकास खातं देण्यास भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी पर्यावरण खात्याऐवजी शिवसेनेला पर्यटन खातं देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीकडून बड्या नेत्यांची लॉबिंग सुरू
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं देण्यात येणार असून त्यामध्ये 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रिपदं असणार आहेत. त्यासाठी आता नेत्यांनी लॉबिंग सुरू केल्याचं चित्र आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. तर त्याआधी माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थिती असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा: