शिंदे-फडणवीसांचं ठरलं! मंत्रिमंडळाची यादी फायनल, महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी चुरस; सूत्रांची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्रीपद हाती आल्यानंतर आता महत्त्वाची खाती पदरात पाडून शिंदे गट प्रयत्नशील असल्याने मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब लागत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून मंत्रिमंडळाची यादी फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, त्याचवेळी ही यादी फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यावर या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
भाजपमधल्या मंत्र्यांची यादी पूर्ण झाली आहे, यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षश्रेष्ठी उत्सुक आहेत अशी माहिती आहे. तर शिंदे गटातील आधीच्याच मंत्र्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील आठ मंत्र्यांना संधी मिळणार आहेच, पण इतर ज्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे त्यांचीही मंत्रिपद मिळण्यासाठी लॉबिंग सुरू आहे. त्यामुळे कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार आणि कुणाला डावललं जाणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये काहीशी अस्वस्थता असल्याचं समजतंय.
महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा सुरू असून ही खाती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कुणाला कोणती खाती मिळणार यावर एक दोन दिवसात चर्चा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. टप्प्याटप्प्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी सूचना या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यामुळे जर टप्प्या-टप्प्याने विस्तार करायचा ठरला तर पहिल्या टप्प्यात किती जणांना संधी मिळणार याबद्दल स्पष्टता नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : शिंदे-फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता
- Uday Samant : तीन सदस्यीय प्रभाग रचना का बदलली ?, उदय सामंत यांचा महाविकास आघाडीला सवाल
- सत्ता येते, सत्ता जाते, समीकरण बदलत असते, पण.... अजित पवारांचा शिंदे सरकारला टोला