अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवसही वादळी? राऊतांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता, तर मविआची महत्त्वाची बैठक
Sanjay Raut News: अर्थसंकल्पीय अधिवेशनात हक्कभंगावरून आजही घमासान होण्याची शक्यता. संजय राऊतांप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही हक्कभंगाचा प्रस्ताव.
Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज (2 मार्च) पुन्हा एकदा विधानभवनात (Vidhan Bhavan) सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकतेला कसं उत्तर द्यायचं यासाठी महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे विधिमंडळाची हक्कभंग समिती स्थापन झाली असून संजय राऊत यांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु आहे आणि त्यासाठी आता विधीमंडळ हक्कभंग समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये राहुल कुल समितीचे प्रमुख असणार आहेत आणि कुल यांच्या अध्यक्षतेखालील 15 सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे.
संजय राऊतांच्या वक्तव्याने मविआत बिघाडी?
संजय राऊतांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. दिवसभराचं कामकाज थांबवून दिवसभर सत्ताधाऱ्यांनी राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. विधीमंडळाच्या हक्कभंग समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष अॅड राहुल कुल असून नितेश राणे, अतुल भातखळकर यांच्यासह 15 जण सदस्य आहेत. ही हक्कभंग समिती संजय राऊतांना गुरुवारी (2 मार्च) कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. तर 10 तारखेला राऊतांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. दरम्यान राऊतांच्या वक्तव्यावरुन मविआत बिघाडी होण्याची शक्यता आहे. याचं कारण राऊतांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने म्हटलं आहे. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ज्या राऊतांनी महाविकास आघाडीची घडी बसवली त्याच राऊतांमुळे ही घडी विस्कटेल का अशी चर्चा सुरु आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊतांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं होतं. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून 'चोर'मंडळ आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला होता. त्यांनी पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्ही अशी पदं ओवाळून टाकतो, असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेना आणि भाजपवर घणाघात केला होता. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर विधीमंडळ सभागृह आणि बाहेर सत्ताधारी राऊतांच्या विरोधात आक्रमक झाले होते.