Maharashtra Budget : नवी मुंबईत महाराष्ट्र भवन तर MPSC साठी स्वतंत्र कार्यालयाची तरतूद
Maharashtra Budget Session 2022 : नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
नवी मुंबईत महाराष्ट्र भवन
राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल. याकरिता 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे.
राज्याचे दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन आहे. दिल्लीमध्ये कामानिमित्ताने जाणाऱ्या लोकांच्या सोईसाठी ते उभारण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत कामासाठी येणाऱ्या लोकांची सोय व्हावी यासाठी नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे.
MPSC साठी स्वतंत्र कार्यालय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामाकाजाकरीता स्वतंत्र भवन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासाठी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे स्वतंत्र भवनासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज मुंबईतील एका भाड्याच्या जागी चालत आहे. त्यावर आता स्वतंत्र कार्यालयाची तरतूद करण्यात आली आहे.
गुढी पाढव्याला मराठी भाषा भवनचे भूमीपूजन
मुंबईमध्ये मराठी भाषा भवन स्थापन करण्यात येणार असून त्यासाठीचे भूमीपूजन येत्या गुढी पाढव्याला म्हणजे 2 एप्रिलला करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मराठी भाषा भवनचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.
विकासाची पंचसूत्री
अजित पवार यांनी विकासाची पंचसूत्री सादर करताना कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती दिली. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच महत्वाच्या गोष्टींवर केंद्रीत अर्थसंकल्प (Maharsahtra Budget 2022) त्यांनी सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Budget Top 10 Highlights: महाविकास आघाडीची 'पंचसूत्री'; अर्थसंकल्पातील सर्वात मोठ्या दहा घोषणा
- Maharashtra Budget Session 2022 : नव्या बुलेट ट्रेन मार्गाचा प्रस्ताव, समृद्धी महामार्गाचा विस्तार; राज्यातील परिवहन क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा
- One Crore For 10 Schools: महापुरुषांच्या गावांतील 10 शाळांना प्रत्येकी 1 कोटींचा निधी, त्या दहा शाळा कोणत्या?