तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून ते ईडीपर्यंत जगजाहीर; पंकजा मुंडे यांचे धनंजय मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra Beed News : तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून ते ईडीपर्यंत जगजाहीर असल्याचं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashtra Beed News : बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या मध्ये चांगलीच खडाजंगी सुरू असताना आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या वादात उडी घेतली आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. माझ्यावर टीका करा... माझ्यावर वार करा... पण माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी जाहीर व्यासपीठावरून पंकजा मुंडे यांना केली होती. यालाच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून उत्तर दिलं आहे.
पंकजा मुंडे ट्वीट
"तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्ट ते ईडीपर्यंत जगजाहीर आहेत. बाकी स्वपक्षातील बीड जिल्ह्याच्या विधानसभा विधानपरीषद आमदारांच्या लक्षवेधी सुचनांवर आधी जाहीर चर्चा घडवून आणा, नंतर आमचा नाद करा.", असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
दोन राजकीय पक्षांमध्ये दोन विचारधारा असू शकतात. विचारधारेची लढाई विचारधारेने होऊ द्या, तुमच्या राजकीय वैऱ्याला बदनाम करायचेय तर जिल्ह्याचे नाव घेऊन बदनामी करु नका. हवे तर माझ्यावर वार करा, पण मायभूमिला बदनाम करु नका असं भावनिक आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
बीड बिहार होतोय अशी टीका पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. एवढंच नाहीतर जिल्ह्यातील ढासाळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी गृहमंत्र्यांनाही पत्र पाठवलं होतं. त्यावरच धनंजय मुंडे आणि कडाडून टीका केली आहे. पंकजा मुंडे याना आमचं चांगलं चाललेलं बघवत नसल्याने त्या जाणून-बुजून बीड जिल्ह्याला बदनाम करत आहेत.
या सर्व प्रकरणानंतर दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. बीडमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या एका जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी बीडच्या माजी पालकमंत्री म्हणजेच, पंकजा मुंडे याना आमचं चांगलं चाललेलं बघवत नसल्यानं त्या जाणून-बुजून बीड जिल्ह्याला बदनाम करत आहेत पंकजा मुंडे आता सत्तेत नाही. त्यामुळे त्यांना बीड बिहारमध्ये गेल्यासारखं वाटतंय म्हणून त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय. मात्र मी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल असून इमानेइतबारे माझं काम करत आहे. त्यामुळे मी हात जोडतो काय टीका करायची ती माझ्यावर करा, मात्र माझ्या मायभूमीला बदनाम करू नका, असं धनंजय मुंडे म्हणाले होते.
धनंजय मुंडे यांच्या या टीकेला पंकजा मुंडे यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.