Maharashtra APMC Election 2023 Live Updates : चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाचा विजय, दहा जागा भाजपला तर आठ महाविकास आघाडीला
Maharashtra APMC Election Live Updates : ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (Agricultural Market Committee Election) आज मतदान होणार आहे.
LIVE
Background
Maharashtra APMC Election 2023 Live Updates : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (Agricultural Market Committee Election) आज मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळं आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला
सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, कुठे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होत आहे. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत.
ग्रामीण भागात कोणाचं वर्चस्व हे 30 एप्रिलला समजणार
राज्यातील 257 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक लागली आहे. यामधील काही बाजार समितीत्या बिनविरोध देखील झाल्या आहेत. बाजार समित्यांसाठी आज (28 एप्रिल) मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला 30 एप्रिललाचं समजणार आहे.
बऱ्याच ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत
स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न केले. प्रचाराच्या सभा, संपर्क मोहीम यासह सर्व पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाच्या पॅनलकडून केला गेला.
Khed APMC : खेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतिम निकाल
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतिम निकाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील काटावर पास झालेत. त्यांच्या सर्वसाधारण मतदारसंघात ते शेवटच्या म्हणजे सातव्या क्रमांकावर राहिले आहेत. 1267 पैकी 589 मतं त्यांना मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता कायम राखण्यात ही यश आलंय.
एकूण 18 जागांमध्ये
राष्ट्रवादी कॉंग्रेसला 10
सर्वपक्षीयांना 6 ( उद्धव ठाकरे शिवसेना 3, भाजप 2 आणि काँग्रेस 1)
अपक्ष 2
APMC Election: वर्धा: चार पैकी तीन बाजार समित्यावर महाविकास आघाडीची बाजी
Wardha APMC Election: वर्धा जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी चार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यात सिंदी रेल्वे, पुलगाव, वर्धा आणि आष्टी या बाजार समित्यांचा समावेश होता. वर्धा, सिंदी रेल्वे आणि पुलगाव येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाने विजय मिळविला आहे. पुलगाव येथे काँग्रेस आमदार रणजित कांबळे गटाचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. तर सिंदी रेल्वे बाजार समितीवर काँग्रेसच्या शेखर शेंडे गटाने झेंडा रोवला आहे. वर्धा येथे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या सहकार गटाचा विजय झाला आहे.
Latur APMC : चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाचा विजय, दहा जागा भाजपला तर आठ महाविकास आघाडीला
चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाचा विजय झाला आहे. 18 पैकी दहा जागा भाजपला तर आठ महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. भाजपाचे माजी आमदार विनायकराव पाटील यांना सत्ता पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणली आहे. अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या मोर्चेबांधणीला म्हणावे तसे यश आले नाही.
Nashik APMC Election: नाशिक: देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-राष्ट्रवादीच्या पॅनलचे वर्चस्व
Nashik APMC Election: नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 17 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. देवळ्यामध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सर्व समावेशक पॅनलची निर्मिती केली होती. यापूर्वी या पॅनलच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. आज झालेल्या 10 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळविला. पॅनल विजयी होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.
Amaravati APMC Election: अमरावती: तिवसा बाजार समितीवर काँग्रेस-ठाकरे गटाचा झेंडा; यशोमती ठाकूर यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी
Amaravati APMC Election: अमरावतीत आज सहा बाजार समितीमध्ये निवडणूक मतदान झाले. यात तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसला भरभरून यश मिळाले आहे. 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. पहिल्यांदा आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील बाजार समितीत ठाकरे गटासोबत उमेदवार दिले. यात यशोमती ठाकूर यांना मोठं यश मिळालं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे उमेदवार यात विजयी झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला आहे.