एबीपी माझा इम्पॅक्ट; महाड दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या नावेदला मदतीचा हात
महाड इमारत दुर्घटनेत नावेदने 35 जणांना बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला होता. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या नावेदला इमारत कोसळत असल्याची शंका येताच त्याने इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावली.
नवी मुंबई : रायगडमधील महाड इमारत दुर्घटनेत देवदूत बनून आलेला नावेद गंभीर जखमी झाला होता. त्याच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला मदतीची गरज असल्याची बातमी काल एबीपी माझाने दाखवली होती. उपचारापोटी लाखो रूपये खर्च येणार असल्याचे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले होते. महाड इमातर दुर्घटनेत 35 लोकांचे जीव वाचवणाऱ्या नावेदचा एक पाय निकामी झाला असून दुसर्या पायालाही दुखापत झाली आहे. याची बातमी एबीपीने दाखवल्यानंतर उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याची दखल घेतली.
उदय सामंत यांनी आज नेरूळ येथील अपोलो रूग्णालयाला भेट देत उपचार घेत असलेल्या नावेदची विचारपूस केली. नावेदवर होत असलेल्या उपचाराचा लाखो रूपये खर्च रूग्णालयाकडून घेण्यात येणार नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर स्वत:कडूनही उदय सामंत यांनी नावेदला आर्थिक मदत केली आहे. सरकारकडून नावेदच्या भविष्यासाठी मदतीचा हात दिला जाईल असा शब्द उदय सामंत यांनी दिला आहे.
महाड इमारत दुर्घटनेत नावेदने 35 जणांना बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला होता. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या नावेदला इमारत कोसळत असल्याची शंका येताच त्याने इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावली. मात्र एका वृद्ध महिलेला बाहेर काढताना इमारत कोसळल्याने नावेद गंभीर जखमी झाला. अचानक त्याच्या दोन्ही पायावर स्लँब कोसळल्याने त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली आहे. एकीकडे पाय नाहीत तर दुसरीकडे उपचारासाठी 13 लाख रूपये आणायचे कुठून असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता.
नावेदला उपचारासाठी नवी मुंबईतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा उजवा पाय गुडघ्याच्या खालून काढावा लागला. तर डाव्या पायात रॉड टाकण्यात येणार आहेत. उपचारापोटी 13 लाखांपर्यंत खर्च येणार असून तो भरायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला होता.
Mahad tragedy | स्पेशल रिपोर्ट | महाड दुर्घटनेत आयुष्यभराची कमाई गेलेल्या कुटुंबाची कहाणी