(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election 2024 : विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार तोफा आज थंडावणार; नेत्यांकडून चांगलाच जोर
दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा थंड होण्यास आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे उरलेल्या वेळात अधिका-अधिक जनसंपर्क साधण्यासाठी उमेदवारांची एकच धावपळ होत असल्याचे चित्र आहे.
Lok Sabha Election 2024 : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक जनसंपर्क साधण्यासाठी उमेदवारांची एकच धावपळ झाली. पक्षातील दिग्गज नेतेही प्रत्यक्ष मैदानात उतरत जाहीर सभांमधून अखेरचा 'मास्टर स्ट्रोक' मारणार आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची अमरावती (Amravati) येथे जाहीर सभा होत आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची परतवाडात सभा झाली.
गृहमंत्री अमित शाहांची अमरावतीत सभा
राज्यात लोकसभेच्या दुसऱ्या टप्पातील 8 मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यासाठी जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे चित्र आहे. आज संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास प्रचाराच्या धडाडणाऱ्या तोफा थंडावणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर ही सभा होत आहे. यासभा स्थळावरुन प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र हा वाद काही अंशी मावळल्याचे बोलले जात आहे. तर आज या सभेमधून अमित शाह नेमकं काय भाष्य करणार या कडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
मुख्य व्यासपीठावर अजित पवारांचा फोटो गायब?
अमित शाह यांच्या सभेला आज भाजप आणि महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहे. मात्र, या सभेच्या मुख्य व्यासपीठावरील बॅनरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब असल्याने चर्चांना उधाण आलंय. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपूर्वी अजित पवार अमरावती येऊन गेलेत. मात्र, असं असतानाही मुख्य व्यासपीठावरील बॅनरवर अजित पवारांचा फोटो गायब असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अमरावतीत राहुल गांधींची सभा
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील आज विदर्भातील पुसद येथे सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुसदच्या छत्रपती शिवाजी महाराज शाळेच्या मैदानावर या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे आज हजारो कार्यकर्त्यांसह शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शेगावात निर्णायक सभा घेणार आहेत. तसेच महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. आज अखेरच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या रोड शो मध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या