Lok Sabha Election 2024: पुढील 36 तासांत प्रचार तोफा थंडावणार; उमेदवार विसरले तहान-भूक, मतदारांचा नेमका कौल कोणाला?
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा थंड होण्यास आता केवळ 36 तास उरले आहे. त्यामुळे उरलेल्या वेळात अधिकाधिक जनसंपर्क साधण्यासाठी उमेदवारांची एकच धावपळ होत असल्याचे चित्र आहे.
Lok Sabha 2024 Nagpur : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. तर या निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा थंड होण्यास आता केवळ 36 तास उरले आहे. त्यामुळे उरलेल्या वेळात अधिका-अधिक जनसंपर्क साधण्यासाठी उमेदवारांची एकच धावपळ होत असल्याचे चित्र आहे. तर त्याकरिता आता पक्षातील दिग्गज नेतेही प्रत्यक्ष मैदानात उतरत जाहीर सभांमधून अखेरचा 'मास्टर स्ट्रोक' मारणार आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) पाठोपाठ राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या (Devendra Fadnavis) सभेला मोठी मागणी असल्याची माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत फडणवीसांनी पूर्व विदर्भात 20 सभा घेतल्या असून आगामी काळात 125 सभांचे नियोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज 16 आणि 17 एप्रिल असे दोन दिवस नागपुरात तळ ठोकणार आहेत. नरखेड, सावनेर येथे सभा घेऊन राम जन्मोत्सवाच्या दिवशी जिल्ह्यातील राम मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही जय्यत तयारी केली असून सभा आणि गाठीभेटींचा सिलसीला वाढवला आहे. त्यामुळे महायुती आणि मविआमध्ये दिग्गज नेते 'फिनिशर'ची भूमिका वठवतांना बघायला मिळत आहे.
पूर्व विदर्भात अवघ्या काही तासांत प्रचार तोफा थंडावणार
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या पर्वाला येत्या 19 एप्रिलपासून पूर्व सुरुवात होत आहे. पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात या निवडणुकांची रणधुमाळी रंगाणार आहे. त्या अनुषंगाने जवळ जवळ सर्वांच पक्षानी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अशातच आता निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिल रोजी होत असून बुधवारी 17 एप्रिलच्या सायंकाळी 6 वाजता या प्रचार तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराला वेग आले आहे.
मतदारांचा नेमका कौल कोणाला?
नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हेवीवेट नेते आणि महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते आमदार विकास ठाकरे यांच्यात चांगलाच सामना रंगतोय. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता बऱ्यापैकी अटीतटीवर येऊन रंगातदार ठरलीय. या दोन्ही नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत मतदारसंघात प्रचाराचा धूरळा उडवला आहे. दोन्ही नेते तहान-भूक विसरून मिळेले त्या संधीचे सोने करत आपल्या प्रचाराला लागले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती पूर्व विदर्भातील उर्वरित मतदारसंघातली असल्याचे चित्र आहे. असे असले तरी मतदार नेमका कोणाला कौल देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या