Lockdown In Mira Bhayandar | मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊनची घोषणा
मुंबईतील मीरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात 13 ते 31 मार्च मध्यरात्री 12 पर्यंत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे.
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मीरा- भाईंदर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मीरा - भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. मीरा- भाईंदर क्षेत्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ते 31 मार्च मध्यरात्री 12 पर्यंत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे.
हॉटस्पॉट क्षेत्राबाहेरील हॉटेल सेवा सुरू
दरम्यान मीरा भाईंदर हॉटस्पॉट क्षेत्राबाहेरील सर्व हॉटेल, बार, बँक्वेट हॉल आणि फूड कोर्ट 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत 30 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.
शुक्रवारी मीरा- भाईंदर क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. आतापर्यंत मीरा भाईंदर क्षेत्रातील 27, 797 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यापैकी 26, 199 रुग्ण बरे झाले असून 792 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एकीकडे औरंगाबाद, नागपूर, पुणे व इतर शहरांमध्ये काही ठिकणी लॉकडाऊन तर काही ठिकाणी कडक निर्बंध लावले जातायेत. मुंबईतही मागील काही दिवसांपासून वाढत जाणारी कोरोना रुग्णसंख्या आता दिवसाला 1500 च्या जवळपास पोहचली आहे. त्यामुळे मुंबईत कडक निर्बंध लागणार का? की मुंबई अंशतः लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे?
प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी मुंबईत घेतली जात असल्याचं सांगण्यात जरी येत असलं तरी राजकारणी आणि प्रशासनामध्ये एकवाक्यता नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मुंबईत लॉकडाऊन होईल का? याची चिंता सतावते आहे. मात्र, मुंबईकरांनी कोरोनाचे नियम योग्यरितीने पाळल्यास आणि योग्य ती खबरदारी घेतल्यास आपण सगळे मिळून पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणात आणू शकतो आणि लॉकडाऊनचं संकट टाळू शकतो.
संबंधित बातम्या :
सावध व्हा! वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवलीत कठोर निर्बंध लागू