रणधुमाळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची, अकोला-वाशिम-बुलढाण्यात कोण ठरणार बाहुबली?
रणधुमाळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची, अकोला-वाशिम-बुलढाण्यात कोण ठरणार बाहुबली?
अकोला : अकोला-वाशिम-बुलढाणा (Akola Washim Buldhana)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी टिपेला पोहोचली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून वसंत खंडेलवाल मैदाणात आहेत. या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यातून 822 मतदार असून अद्याप भूमिका स्पष्ट न करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया तब्बल चौथ्यांदा रिंगणात उतरेले आहेत. त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीसह प्रहारचा पाठींबा आहे. या निवडणुकीत विजयाचा चौकार मारण्याचा दावा बाजोरियांनी केला आहे.
या निवडणुकीवर अर्थकारणाचा मोठा प्रभाव आहे. भाजपने या निवडणुकीत बाजोरियांच्या तोडीस तोड उमेदवार दिला आहे. अकोल्यातील प्रख्यात सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल भाजपचे उमेदवार आहेत. बाजोरियांनी राजकारणाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी केल्याचा गंभीर आरोप खंडेलवाल यांनी केलाय.
गेल्या तिन्ही निवडणुकीत पुरेसं संख्याबळ नसताना बाजोरियांनी विजयाचा चमत्कार केला होता. यात 85 मतदार असलेल्या वंचितचे वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर आणि मानोराचे 20 नगरसेवक अलिकडेच राष्ट्रवादीत गेले आहेत. तरीही आता 65 मतदार राहिलेल्या वंचितची भूमिका यात निर्णायक असणार आहे.
निवडणुकीत सर्वार्थाने अर्थकारण निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे 14 डिसेंबरच्या मतमोजणीनंतर या मतदारसंघात कोण खरा 'बाहूबली' आहे हे समजणार आहे.
कोण आहेत गोपीकिशन बाजोरिया?
राज्यातील प्रख्यात जमीन आणि बांधकाम व्यायसायिक
विधान परिषदेच्या अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया 2004 पासून सलग तीनदा विजयी.
सध्या विधान परिषदेत पक्षाचे मुख्य प्रतोद.
विधान परिषद निवडणूक रणनितीचे 'चााणक्य' म्हणून ओळख. दोन वर्षांपूर्वी मुलगा विप्लवला परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आणलं निवडून.
कोण आहेत आहेत वसंत खंडेलवाल?
वसंत खंडेलवाल अकोल्यातील प्रख्यात सराफा व्यावसायिक.
खंडेलवाल घराणं संघ, जनसंघ आणि भाजपशी एकनिष्ठ. वसंत खंडेलवालांचे आजोबा 'काकाजी' खंडेलवाल आणि वडील मदनलाल खंडेलवाल विदर्भातील जनसंघ आणि नंतर भाजपचे जेष्ठ नेते.
खंडेलवाल कुटुंबीयांशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे कौटूंबीक संबंध.
वसंत खंडेलवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक.
इतर महत्वाच्या बातम्या