Prabha Atre : श्रोते हाच माझा सर्वात मोठा पुरस्कार : डॉ. प्रभा अत्रे
Prabha Atre : डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याने विलेपार्ल्यातल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रभाताईंच्या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
Prabha Atre : माझ्यातील कलाकाराला श्रोत्यांनी घडवले आहे. कलाकाराचे यश हे नाव आणि पैसा यात मोजले जात आहे. पण माझ्यातील कलाकाराला तुम्ही वाढवले आहे. श्रोते हाच माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे, अशा शब्दात डॉ. प्रभा अत्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विलेपार्ल्यात आयोजित केलेल्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे (Dr. Prabha Atre) यांना केंद्र शासनाच्या वतीनं नुकताच पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात करण्यात आला आहे. त्यानिमित्त हृदयेश आर्टसच्या वतीनं विलेपार्ल्यातल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रभाताईंच्या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रभा अत्रे यांना शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच ब्ल्यू क्रॉस लॅबोरेटरीजच्या वतीने डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनसाठी पाच लाख रुपयांचा धनादेशदेखील देण्यात आला आहे. या गौरव सोहळ्यात पंडित हरिप्रसाद चौरसिया, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि हृदयेश आर्टसचे अविनाश प्रभावळकर उपस्थित होते.
डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या,"आज माझ्या रक्ताची माणसे, गुरू माझ्या जवळ नाहीत याचं दुःख आहे. पण सांगीतिक परिवार माझ्या सोबत आहे. संगीतामुळे मला जगातील अनेक सुंदर गोष्टी अनुभवायला मिळाल्या. माझ्यातील कलाकाराला श्रोत्यांनी घडवले आहे. कलाकाराचे यश हे नाव आणि पैश्यात मोजले जात आहे. पण माझ्यातील कलाकाराला तुम्ही वाढवले आहे. श्रोते हाच माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे".
गौरव सोहळ्यादरम्यान एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले, "पार्लेकर झाल्यामुळे मला या कार्यक्रमाला हजर राहता आलं. नाव ठेवताना चपखल ठेवलं जातं त्यापैकी एक नाव म्हणजे प्रभा. या नावाला झळाळी मिळाली. इंग्रजीत प्रभा म्हणजे डॉन. या वयात त्या खूप सुंदर दिसतात. त्यांना हे कसं साध्य झालं हे सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. त्या कट्ट्यावर आल्या असत्या तर मी त्यांना हा पहिला प्रश्न विचारला असता".
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले,"प्रभाताई यांचा सन्मान नाही तर त्या आल्यामुळे आमचा सन्मान झाला असे वाटत आहे. संगीत, कला हे साधनेचे विषय आहेत. शास्त्रीय संगीत कळायला साधना लागते. डबक्यात राहणाऱ्या लोकांना समुद्राची मजा कळत नाही. त्यानुसार कितीही आधुनिक संगीत आणा, पण जुन्या संगीताची मजा आहे".
माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले,"प्रभाताई या एका व्यक्तिमत्त्वात इतके पैलू असू शकतात हे प्रभाताई यांच्यामुळे कळते. रियाज, प्रयोगशीलता यांचा समुचय म्हणजे प्रभाताई".
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha