शरद पवारांचा मानसपुत्र काल रात्री जरांगेंच्या गोधडीत शिरला; मराठा आंदोलनावरुन लक्ष्मण हाकेंचा संताप
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केलं आहे.
Laxman Hake : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनावरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. आपण सत्तेत असताना आपल्याला हे का सुचले नाही, असा सवाल हाके यांनी शरद पवार यांना केला. पवार साहेब उगीच वेड पांघरुन पेडगावला जायचा उद्योग करु नका असेही हाके म्हणाले. शरद पवार यांचा मानसपुत्र राजेश टोपे (Rajesh Tope) हा काल रात्री अकरा वाजता जरांगेच्या गोधडीत शिरून काय बोलतो असा सवाल हाके यांनी केला आहे.
विरोधी आमदाराबरोबर अजित पवार गटाच्या काही सत्ताधारी आमदारांची जरागेंना मदत
मनोज जरांगे याचा इतिहास दंगलीचा आहे लोकशाही न मानणारा आहे. त्यांना ओबीसी आरक्षण संपवायचं आहे. तो शरद पवार आणि त्यांच्या चेल्या चपट्याच्या सुपारी घेऊन आरक्षणाचे आंदोलन करत आहे. याला पंचायत राजमधील ओबीसीचे आरक्षण संपवायचेआहे अशी टीका हाके यांनी केली. शरद पवार यांचा मानसपुत्र राजेश टोपे हा काल रात्री अकरा वाजता जरांगेच्या गोधडीत शिरून काय बोलतो असा सवाल हाके यांनी केला आहे. याला शरद पवार रोहित पवार यांची आयटी सेल मदत करीत असून विरोधी आमदाराबरोबर अजित पवार गटाचे काही सत्ताधारी आमदार देखील याला छुपी मदत करत आहेत असे हाके म्हणाले.
हा माणूस झुंड गोळा करुन एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागतोय
मनोज जरांगे उद्या पाणी त्याग करेल नाही तरी अजून काही करेल, पण संविधान न मानणारा, न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारा, शासन प्रशासनाला न मानणारा हा माणूस लोकशाहीच्या विरोधात वागत असल्याचे हाके म्हणाले. झुंड गोळा करुन एखाद्या हुकूमशहाप्रमाणे हा माणूस वागत असल्याचे हाके म्हणाले. जरांगेच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे, ओबीसीमधून आरक्षण मागत असल्याचे हाके म्हणाले.
या माणसाचा इतिहास दंगलीचा
मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगत होतो की या माणसाला मुंबईकडे येऊ देऊ नका या माणसाचा इतिहास दंगलीचा आहे. या माणसाला संविधान कळत नाही या माणसाला कायदा आणि लोकशाही देखील कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून हा माणूस माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करत आहे, ओबीसी बांधव चिंतेत आहेत असे हाके म्हणाले. मनोज जरांगे येडपट आहे याच्या अशा वागण्याने ओबीसी आरक्षण संपेल अशी भीती वाटत आहे. सर्व मंत्र्यांना आमदारांना आमचा सवाल आहे की तुम्हाला ओबीसीच आरक्षण संपवायचं आहे का? असे हाके म्हणाले. मनोज जरांगेला जे पाठिंबा देत आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी असे हाके म्हणाले.
लक्ष्मण हाके यांची शरद पवार यांच्यावर टीका
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. तामिळनाडूमध्ये 69 टक्के आरक्षण दिले जाते, पण महाराष्ट्रात 72 टक्के आरक्षण सध्या दिले जात आहे. आपण सत्तेत असताना आपल्याला हे का सुचले नाही असा सवाल हाके यांनी शरद पवार यांना केला. उगीच वेळ पांघरपन पेडगावला जायचा उद्योग करु नका पवार साहेब असे हाके म्हणाले.
ओबीसी आरक्षण संपवण्याची सुपारी मनोज जरांगेनं घेतलीय
याला मुंबईत येऊ देऊ नका म्हणून आम्ही सांगून दमलो. न्यायालयानेही याच पद्धतीने सूचना दिल्या होत्या. मात्र राज्य सरकार प्रशासन आणि पोलीस यांनी त्याला परवानगी दिली आहे. आता त्याने सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरले आहे. मुख्यमंत्री साहेब आता तरी या जरांगेला आवरा अजून वेळ गेलेली नाही असे हाके म्हणाले. त्याला गोरगरीब मराठ्याचे काही पडले नसून त्याला फक्त पंचायत राज महापालिका नगरपालिका निवडणुका दिसू लागल्या आहेत. यातील ओबीसी आरक्षण संपवण्याची सुपारी त्याने घेतली आहे. पवार साहेब तुम्ही घटनादुरुस्ती करा म्हणता यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागते आणि सर्व राज्यांची संमती लागते. तुम्हाला फक्त राज्यात आणि देशात अराजकता माजवायची आहे, अशी टीका हाकेंनी केली. तामिळनाडूप्रमाणे घटना दुरुस्ती करायचा प्रयत्न झाला तरी देखील घटनेच्या मूळ ढाच्याला कोणीही हात लावू शकत नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे हाके म्हणाले. पवार साहेबांनी धुळफेक करणे बंद करुन जरा शहाण्यासारखे वागावे अन्यथा महाराष्ट्रात वातावरण हाताबाहेर गेलेले दिसेल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
























