17 व्या वर्षापासून छावा संघटनेमध्ये कार्यरत, 2013 पासून प्रदेशाध्यक्ष, लातूरमध्ये मारहाण झालेले विजय घाडगे कोण?
विजयकुमार घाडगे हे वयाच्या 17 व्या वर्षापासून अखिल भारतीय छावा संघटनेमध्ये कार्यरत आहेत. संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचा अल्पावधीत प्रदेशाध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली होती.

Vijay Ghadge : लातूरमध्ये (Latur) काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्य विजय घाडगे (Vijay Ghadge) यांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर छावा संघटना (Chhawa Sanghatana) आक्रमक झाली आहे. तसेच विरोधी पक्षांनी देखील या घटनेचा निषेध करत सूरज चव्हाण यांच्यावर टीका केलीय. दरम्यान, काल मारहाण झालेले विजय घाडगे नेमके कोण आहेत? त्यांची कारकिर्द काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
17 व्या वर्षापासून अखिल भारतीय छावा संघटनेमध्ये कार्यरत
विजयकुमार घाडगे हे वयाच्या 17 व्या वर्षापासून अखिल भारतीय छावा संघटनेमध्ये कार्यरत आहेत. संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचा अल्पावधीत प्रदेशाध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली होती. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या मृत्यूनंतर संघटनेची धुरा नानासाहेब जावळे पाटलाकडे गेली. त्यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विजयकुमार घाडगे यांची निवड करण्यात आली होती. 2013 पासून आजपर्यंत विजय घाडगे हे प्रदेशाध्यक्षपदावर काम करत आहेत.
शेतीच्या, शिक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन केली
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या विजयकुमार घाडगे यांनी शेतीच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन केली आहेत. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आंदोलने केली आहेत. तसेच सोयाबीनला भाव देण्यात यावा यासाठी ओसा इथं विजय घाडगे यांनी आमरण उपोषण केलं होतं. पिक विम्याच्या संदर्भात पावसामुळं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली आहेत. 2019 मध्ये बारा दिवसाचा आमरण उपोषण त्यांनी केलं होतं. 2024 मध्ये सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून उपोषण केलं होतं. शेतमालाला योग्य भाव देण्यात यावा यासाठी वेळोवेळी अनेक आंदोलने त्यांनी केली आहेत. अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी कर्जमाफी नुकसान किंवा भरपाई द्यावी यासाठी आंदोलने केली आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात, फी वाढीच्या विरोधातही होणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभाग आणि नेतृत्व विजय घाडगे यांनी केलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपताच त्यांना निवेदन दिलं. माजी मंत्री संजय बनसोडे देखील तिथं उपस्थित होते. यावेळी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याच वेळी टेबलवर पत्ते देखील फेकण्यात आले. यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:
























