Suraj Chavan Resignation: सूरज चव्हाणांना छावाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर हात टाकणं भोवलं, अजित पवारांनी राजीनामा द्यायला सांगितला
Suraj Chavan Resignation: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी रविवारी लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती.

Suraj Chavan Resignation: लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची अखेर उचलबांगडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरज चव्हाण यांना तातडीने भेटायला बोलावले होते. मात्र, या भेटीपूर्वीच अजित पवार यांनी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना दिली. अजित पवार यांनी भेटायला बोलावल्यानंतरच सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होणार, असे संकेत मिळत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सूरज चव्हाण यांच्या कृत्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पदमुक्त होण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जाते.
अजित पवार यांनी सोमवारी यासंदर्भात एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
सूरज चव्हाण हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. अजित पवारांनी शरद पवारांची राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यासोबत सुरुवातीच्या टप्प्यात बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये सूरज चव्हाण यांचा समावेश होता. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्यावर झालेली ही कारवाई मोठे पाऊल मानले जात आहे.
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 21, 2025
पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत…
Ajit Pawar: अजित पवारांनी सूरज चव्हाणांना राजीनामा द्यायला का सांगितला?
लातूरमध्ये व्हिडीओत सूरज चव्हाण स्पष्टपणे छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसत होते. कालची घटना आणि त्यानंतर मराठा संघटनांचा निर्माण झालेला राग शमवण्यासाठी अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. छावा ही राज्यातील प्रमुख मराठा संघटनांपैकी एक आहे. या संघटनेचे राज्यात वर्चस्व आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा संघटनांची नाराजी त्रासदायक ठरु शकते. अजित पवार हा धोका पत्कारायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. कालपासून सर्वच स्तरातून अजित पवार यांच्यावर टीका सुरु होती. मराठी समाजाचा विषय येतो तेव्हा अजित पवार ठोस भूमिका घेत नाहीत, असा आरोप सातत्याने केला जातो. मराठा आरक्षण आंदोलनावेळीही अजिदादांनी स्पष्टपणे भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे आता मराठा संघटनांचा आणखी राग पक्षाला परवडणारा नाही. त्यामुळे अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तातडीने राजीनामा द्यायला सांगितला.
आणखी वाचा
लातूर मारहाण प्रकरण! विजय घाटगेंना मारहाण करणारा सूरज चव्हाण कोण? जाणून घ्या सविस्तर माहिती
























