konkan rain : संपूर्ण कोकणात पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट, अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा
सध्या कोकणात जोरदार पाऊस सुरु आहे. संपूर्ण कोकणासाठी पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Konkan Rain : आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरुआहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, कोकणात देखील पाऊस सुरु आहे. संपूर्ण कोकणासाठी पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही तासापासून मुंबई काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईतील सायन परिसर हा सखल मानला जातो आणि त्यामुळं या भागात नेहमी पाणी साचल्याचं बघायला मिळतं. सायन स्थानकापासून हाकेच्या अंतरावर पाणी साचल्याचं बघायला मिळालं. अशात महापालिकेकडून पाण्याचा निचरा केला जात आहे.
मुंबईसह उपनगरात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र सकाळी काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
काल झालेल्या पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात बुधवारी रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहे. तर अधून मधून जोरदार पाऊस आहे. काल दुपारनंतर वसई विरार मध्ये पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे. वसई, नालासोपारा आणि विरार मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. यामुळे पालिकेचा नालेसफाई दावा फोल ठरल्याच दिसून येत आहे.