हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री, राज्यात पुरेशी सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करा, किसान सभेची मागणी
सध्या राज्यातील सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत.
Kisan Sabha on Soybean Price : सध्या राज्यातील सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील खरिपाचे महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनला सरकारच्या धोरणामुळे आधार भावापेक्षाही कमी भाव मिळत आहे. त्यामुळं सरकारनं राज्यात पुरेशी सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करावी अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मते मिळावीत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सोयाबीनला 6000 रुपये भाव देईल अशी घोषणा केली होती. सोयाबीन खरेदीसाठीचा मॉईश्चर निकष सुद्धा 15 टक्क्यापर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. तत्पूर्वी मोदी की गॅरंटी म्हणून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीनला 4892 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष खदखदतो आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने याबाबत हस्तक्षेप करून दिलेला शब्द पाळावा व किमान 6000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 15 टक्के मॉइश्चर असलेले सोयाबीन खरेदी करणारी केंद्रे प्रत्येक बाजार समितीत सुरू करावीत अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून 4000 रुपये प्रतिक्विंटल दरानं सोबायीनची खरेदी
राज्यात काही ठिकाणी हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तरी सर्व बाजार समित्यांवर ही केंद्रे नसल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन वाहून नेण्यासाठी मोठा खर्च होत आहे. वाहतुकीचा खर्च न परवडल्यामुळे शेतकरी आपले सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना 4000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विकत आहेत. राज्य व केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून राज्यभरातील सर्व बाजार समित्यांमध्ये सरकारी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्यात सोयाबीनला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका भाषणात ‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र, तेवढा दर मिळत नाही. याच मुद्यावरुन किसान सभेनं टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या: