(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खारघर दुर्घटना प्रकरण, संजय राऊतांच्या विरोधात मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार; वाचा काय आहे प्रकरण
Kharghar Heat Stroke: खारघर दुर्घटनाप्रकरणी चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
मुंबई : खारघर दुर्घटनेत 50 जणांचा मृत्यू झाला, हे वक्तव्य खासदार संजय राऊतांना भोवण्याशी शक्यता आहे. कारण राऊतांविरोधात या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, किरण पावसकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्याकडे तक्रार केली आहे. संजय राऊतांचं हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. खारघरमधील दुर्घटनेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? त्यांना मन आहे की नाही, असे प्रश्न राऊतांनी उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळं मृत्यू झालेल्या श्रीसदस्यांच्या मृत्यूचं कारण प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या बहुतेक श्रीसदस्यांनी आधीच सहासात तासात पाणीच प्यायलं नसल्याचं दिसून आलंय. काहींच्या पोटात अगदी कमी प्रमाणात अन्न गेलं होतं, तर बहुतेक जणांच्या पोटात अन्नाचा कणही नसल्याचंही दिसून आलं.
खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीस समिती स्थापन
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या दिवशी नवी मुंबईत 39 ते 41 अंश सेल्सिअस तापमान होतं. त्या तापमानात शरीरातील पाणी कमी झालं, आणि सोबतच रक्तातील प्रोटिन्सवर परिणाम झाल्याचं वैद्यकीय निरीक्षण आहे. खारघरमधील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती आहे. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत दुर्घटनेबाबतचा अहवाल सादर करणार आहे. तसंच भविष्यात अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती सरकारला शिफारशी करेल.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अॅक्शन मोडमध्ये
खारघरमधील घटनेनंतर उष्माघात किती भयावह असू शकतो हे दिसून आले. उन्हाळ्यात उष्माघातामुळे देशभरात होणारे हजारो मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण देशासाठी एकसारखा हिट ऍक्शन प्लान तयार करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला (VNIT) जबाबदारी सोपवली असून त्याचा अहवाल लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सोपवला जाणार आहे. याच अभ्यासात काही महत्त्वाचे प्रश्न समोर आले आहेत, ज्याचा विचार शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज आहे.