Kharghar Heatstroke: खारघर दुर्घटनेच्या अहवालासाठी समितीने मागितली मुदतवाढ, दीड महिना उलटूनही अहवाल नाही
Kharghar Heatstroke: खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या एकल सदस्यीय समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही.
Kharghar Heatstroke: खारघर दुर्घटनेला दीड महिना उलटून गेला तरी चौकशी समितीने अहवाल सादर केला नाही. आता अहवाल सादर करण्यासाठी समितीने एक महिन्याची मुदत मागितली आहे. 16 एप्रिल रोजी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने 20 एप्रिल रोजी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली होती आणि त्यांना एक महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या एकल सदस्यीय समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही. अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर यांच्या नेतृत्वाखालील समितीने आता अहवालासाठी एक महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. खारघर दुर्घटनेनंतर, राज्य सरकारने 21 एप्रिल रोजी या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि महिनाभरात अहवाल सादर करण्याची घोषणा केली होती. मात्र आता या समितीने अहवाल सादर करण्यासाठी आणखी महिनाभराची मुदत मागितली आहे.
खारघर प्रकरणावर दाखल जनहित याचिकेवर 8 जूनला सुनावणी
खारघर प्रकरणावर दाखल जनहित याचिकेवर 8 जूनला सुनावणी होणार आहे. हायकोर्टाने तातडीच्या सुनावणीस नकार दिलाआ आहे. मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहेय 14 जणांच्या मृत्यूला जबाबदार धरत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींवरही फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठीच कडक उन्हात इतका भव्य कार्यक्रम केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. विरारच्या सामाजिक कार्यकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुतेंमार्फत याचिका दाखल केली आहे.
खारगर प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप
खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना "महाराष्ट्र भूषण" पुरस्काराने सन्मानित करण्याच्या कार्यक्रमात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे 14 श्रीसेवकांचा जीव गेला. मात्र सरकारने या दुर्दैवी घटनेनंतर कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सरकारने जारी केलेल्या आकड्यांबाबत आजही संभ्रम कायम आहे. अद्याप स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत मृत्यूची नोंद झाली नाही, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केले आहे. याचिकेच्या माध्यमातून कोण राजकारण करतंय असा सवाल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची आधीची नियोजत वेळ संध्याकाळची होती मात्र श्रीसेवकांची व्यवस्था पाहता आप्पासाहेबांनी कार्यक्रम रात्री ठेवू नका अशी विनंती केल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तसंच उष्माघात नैसर्गिक होता. नियोजनाबाबत चर्चा होऊ शकते. मात्र सर्वपक्षीयांनी केवळ राजकारण करण्यातच धन्यता मानली अशी टीकाही त्यांनी केलीय.