(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निळ्याचं पांढरं रॉकेल करणारा भुरटा 'राजहंस' नाशिकमध्ये अटक
नाशिकमध्ये रॉकेलचा काळा बाजार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. रेशन दुकानातून मिळणाऱ्या निळ्या रॉकेलमध्ये केमिकल पावडर मिसळून ते सफेद केलं जात असे.
नाशिक : नाशिकमध्ये रॉकेलचा काळा बाजार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. रेशन दुकानातून मिळणाऱ्या निळ्या रॉकेलमध्ये केमिकल पावडर मिसळून ते सफेद केलं जात असे. त्यानंतर सफेद रॉकेलची बाजारात चढ्या दराने विक्री केली जात असे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा नाशिकमध्ये गोरखधंदा सुरू होता. नाशिकच्या म्हसरूळ भागात असा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी परिसरातील गोदामावर छापा टाकून ८५ लिटर निळे रॉकेल, १० लिटर प्रकिया करून सफेद केलेल्या रॉकेलसह इतर मुद्देमाल आणि कागदपत्र जप्त केली.
रॉकेच्या या गोरखधंद्यात मोठं रॅकेट असल्याच संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हा पुरवठा विभाग सक्रीय झाला असून रेशन दुकानांच्या माध्यमातून रॉकेलची विक्री करणाऱ्या दुकानदाराची चौकशी केली जाणार आहे.