(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिलासाठी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ठेवून घेतलं! व्हिडीओ व्हायरल, खामगावमधील संतापजनक घटना
बुलडाण्यातील खामगाव येथील एका खाजगी कोविड सेंटरच्या प्रशासनाने बिलातील 11 हजार रुपयांकरता चक्क रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेऊन घेतलं. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यावर ही संतापजनक घटना समोर आली.
बुलडाणा : जनता कोरोना आणि लॉकडाऊनने त्रस्त असताना काही खाजगी कोविड सेंटर मनमानी करत असल्याचं चित्र समोर येत आहे. नांदेड येथील एका कोविड सेंटरने मृत रुग्णाला तीन दिवस उपचार करून बिल वसूल केल्याची घटना ताजी असताना आता बुलडाण्यातील खामगाव येथील एका खाजगी कोविड सेंटरच्या प्रशासनाने बिलातील 11 हजार रुपयांकरता चक्क रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेऊन घेतलं. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यावर ही संतापजनक घटना समोर आली. इतकं असूनही रुग्णालय प्रशासन या व्हिडीओ बद्दल अनभिज्ञ असल्याचं भासवत आहे. विशेष म्हणजे या रुग्णाची कोविड टेस्ट निगेटिव्ह असून देखील फक्त MRI रिपोर्टनुसार हा रुग्ण कोरोनाबधित दाखवून ह्या रुग्णाला कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आलं.
खामगाव शहरातील चार ते पाच डॉक्टरांनी हे जुनं रुग्णालय भाड्याने घेऊन खाजगी कोविड सेंटर सुरू केलं. 13 तारखेला दुर्गम असलेल्या आवार गावातील मंगेश गवई नावाचा तरुण सर्दी,ताप या आजारासाठी या कोविड सेंटर चालकांपैकी एका डॉ .पंकज मंत्री यांच्याकडे गेला असता त्यांनी त्याला छातीचा MRI करायला सांगितला. पण पैसे नसल्याने हा रुग्ण आपल्या गावी परत गेला आणि अटाळी येथील आरोग्य केंद्रात जाऊन कोविड टेस्ट करून घेतली असता ती निगेटिव्ह आली. आपण कोरोनाबाधित नसल्याची खात्री झाल्यावर आपल्याला ताप येतो म्हणून MRI करूनच घेऊ असं ठरवून त्यांनी ती टेस्ट केली व परत डॉ.मंत्री यांना रिपोर्ट दाखविला असता त्यांनी RTPCR टेस्ट न करताच तुम्हाला कोरोनाची लक्षणे असून तुम्ही आमच्या कोविड सेंटरला भरती व्हा असा सल्ला दिला.
शेतमजूर परिवारातील व अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही व कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असताही जुळवाजुळव करून या रुग्णाने नऊ दिवस उपचार घेतले. या नऊ दिवसाचे बिल रुग्णालय प्रशासनाने 81 हजार रुपये काढले. रुग्णाने 70 हजार रुपये जमा केल्यावर 11 हजार रुपये आम्ही घरी गेल्यावर पुन्हा आणून देतो असं म्हटल्यावरही रुग्णालयाने त्यांना सुट्टी देण्यास नकार दिला. पूर्ण पैसे आताच द्या नाहीतर रुग्णाला सुटी मिळणार नाही असं सांगितलं. त्यावेळी आमच्याकडे पैसे आहेत पण घरी आहेत असं नातेवाईकांनी सांगितल्यावरही त्यांच्यावर विश्वास न ठेवता रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेऊन द्या आणि पैसे आणून द्या, असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं. नातेवाईकांनी तात्काळ मंगळसूत्र दिल्यावर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला सुट्टी दिली. हा सर्व प्रकार एका व्हिडिओद्वारे समाज माध्यमातून वायरल झाल्यावर रुग्णालय प्रशासन जागे झाले. तडकाफडकी रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावून समजूत काढण्याचाही प्रयत्न केला पण तो पर्यंत उशीर झाला होता. समाज माध्यमातून यावर संतापजनक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती.
याबाबत रुग्णालय प्रशासनाने जसं काही झालंच नाही असा आव आणून आम्हाला या वायरल व्हिडीओ बाबत काहीच माहीत नसल्याचं कोविड सेंटरचे संचालक डॉ.सम्राट मानकर व डॉ. गौरव गोयंका यांनी सांगितलं.परंतु हा रुग्ण कोरोनाबाधित नसताना देखील त्यांनी या रुग्णावर कोविड सेंटरमध्ये उपचार का केले असं विचारलं असता रुग्ण कोविड पॉझिटीव्ह होता असं त्यांनी सांगितलं.