Kartik Purnima 2021 : कार्तिक स्वामींचं देशातील एकमेव मंदिर बुलडाण्यात; वर्षातून एकदाच उघडतात दारं
Kartik Purnima 2021 : आज कार्तिक पौर्णिमा... कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर बुलडाण्यातील खामगावाजवळ असलेल्या घाटपुरी येथील कार्तिक स्वामीचं देशातील एकमेव मंदिर भक्तांसाठी उघडण्यात आलं आहे.
Kartik Purnima 2021 : आज कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर बुलडाण्यातील खामगावाजवळ असलेल्या घाटपुरी येथील कार्तिक स्वामीचं देशातील एकमेव मंदिर भक्तांसाठी उघडलं आहे. हे मंदिर एकमेव अशासाठी आहे की, वर पंचमुखी हनुमान आणि खाली गाभाऱ्यात कार्तिक स्वामींच मंदिर आहे. वर्षातून फक्त एकाच दिवशी म्हणजे, कार्तिक पौर्णिमेला हे मंदिर उघडण्यात येतं. आज या मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी आहे.
हे मंदिर वर्षातून एकदाच का उघडण्यात येतं? काय आहे कार्तिक स्वामींची आख्यायिका?
शंकर आणि पार्वतीला दोन मुलं होती. मोठा कार्तिक आणि धाकटा गणपती. शंकरजींनी जेव्हा दोन्ही मुलांना आदेश दिला की, पृथ्वीची प्रदक्षिणा जो आधी पूर्ण करेल तो खरा बुद्धिमान असेल. असं म्हणताच कार्तिक स्वामी आपलं वाहन मोरावर बसून पृथ्वीच्या प्रदक्षिणेसाठी निघून गेले. गणपती मात्र जाडजूड असल्यानं जागेवर आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा मारून म्हटला की, माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली. तेव्हापासून श्रीगणेशाला बुद्धिचं दैवंत समजलं जात असल्याचं म्हटलं जातं. पण जेव्हा कार्तिक स्वामी अनेक महिन्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून परत आले आणि त्यांना कळलं की, गणपतीला बुद्धिमान ठरविण्यात आलं. त्यावेळी ते संतापले आणि रागाने जंगलात तपश्चर्येसाठी निघून गेले. जेव्हा शंकर पार्वती कार्तिकेला भेटायला गेले. त्यावेळी कार्तिकने आपल्याच आईवडिलांना शाप दिला की, जो मला भेटायला येईल तो सातजन्म नरकात जाईल आणि महिला विधवा होईल. पण पार्वतीनं हट्ट करून कार्तिकेला म्हटलं अस करू नको. वर्षातून एक दिवस तरी आम्हाला भेट. त्यावेळी कार्तिकने कार्तिक पौर्णिमा याच दिवशी मी भक्तांना भेट देईल, असं जाहीर केलं. तेव्हापासून कार्तिक स्वामींच मंदिर वर्षातून फक्त कार्तिक पौर्णिमेला उघडण्यात येतं.
दरम्यान, बुलढाडाण्यातील खामगाव शहराच्या पश्चिमेस असलेलं घाटपुरी येथील कार्तिक स्वामींच मंदिर हे वर पंचमुखी हनुमान आणि खाली भुयारात कार्तिक स्वामींच मंदिर असं देशातील एकमेव आणि पुरातन मंदिर आहे. हे मंदिर वर्षातून एकच दिवस उघडण्यात येत असल्याने या मंदिरात कार्तिक पौर्णिमेला दूर दुरून भक्त दर्शनासाठी येतात. आज सकाळपासून हे मंदिर उघडण्यात आलं असून संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथून भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
In Pics : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील मंदिरे हजारो दिव्यांनी उजळली