Kalyani Kurale Jadhav : आई, वडिल, लेकराला 'प्रेमाची भाकरी' खाऊ घातली अन् काही मिनिटांत 'तुझ्यात जीव रंगला' फेम कल्याणी कुरळे-जाधव रक्ताच्या थारोळ्यात
कोल्हापूरच्या मातीतील हरहुन्नरी प्रतिभाशाली अभिनेत्री 'तुझ्यात जीव रंगला' फेम कल्याणी कुरळे-जाधव हिचा कोल्हापूर सांगली महामार्गावर हालोंडीजवळ घरी येत असताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने मृत्यू झाला.
Kalyani Kurale Jadhav : कोल्हापूरच्या मातीतील हरहुन्नरी प्रतिभाशाली अभिनेत्री 'तुझ्यात जीव रंगला' फेम कल्याणी कुरळे-जाधवचा शनिवारी रात्री कोल्हापूर-सांगली महामार्गावर हालोंडीजवळ मोपेडवरून घरी येत असताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने मृत्यू झाला. एका 32 वर्षीय उमद्या आणि ध्येयवेड्या अभिनेत्रीचा अशा प्रकारे शेवट झाल्याने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कल्याणीने अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीच हालोंडीत 'प्रेमाची भाकरी' नावाचे हाॅटेल सुरु करून उद्योग क्षेत्रातही पदार्पण केले होते. मात्र, उद्योगातही नशीब आजमावण्यापूर्वीच नियतीने तिचा खेळ अर्ध्यावर मोडला. कल्याणीच्या पश्चात पश्चात मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
कल्याणी मुळची कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील.वडिल रिक्षाचालक असूनही तिने स्वप्नांना कधी स्वप्न होऊ दिले नाही. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांमधून केली होती. कल्याणीने ‘नरशार्दुल राजा संभाजी’ महानाट्यात त्यांनी सईबाईंची भूमिका साकारत आपल्या प्रतिभेची छाप सोडली होती. त्यानंतर तिचे अभिनयाचे क्षितीज विस्तारत चालले होते. त्यानंतर कल्याणी छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’,‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, ‘सुंदरी’ या मालिकांमध्येह झळकली. जाहिरातींमध्येही कल्याणी झळकली होती. त्यामुळे घरी प्रतिकूल परिस्थिती असतानाही तिने आपली दमदार वाटचाल सुरू ठेवली होती.
काही दिवसांपूर्वीच हाॅटेल व्यवसायात पदार्पण
कल्याणीने अभिनय सुरु ठेवण्याबरोबरच हाॅटेल व्यवसायातही काही दिवसांपूर्वीच पर्दापण केले होते. तिने अवघ्या 15 दिवसांपूर्वीच आपल्या वाढदिनी 29 ऑक्टोबरला हालोंडी येथील खाऊ गल्लीत 'प्रेमाची भाकरी' नावाचे हाॅटेल सुरु केले होते. या हाॅटेलसाठी सुद्धा कल्याणीने स्वत: सजवले होते.
हाॅटेलमध्ये जेवण्यासाठी आई वडिलांना जेवण्यास बोलावले होते
शनिवारी संध्याकाळी कल्याणीने आपल्या मेहनतीने सुरु केलेल्या हाॅटेलमध्ये जेवण्यासाठी आई वडिल आणि मुलगा अभिजीतला बोलावले होते. त्यांनी यावेळी हाॅटेलमध्ये गप्पा करत जेवण केले. जेवण केल्यानंतर कल्याणी हाॅटेल बंद करून स्वत: मोपेडवरून कोल्हापूर येत होती, तर वडिलांच्या रिक्षातून आई आणि मुलगा येत होता. हाॅटेलमधील महिलेला कल्याणीने हालोंडी फाट्याजवळ सोडून महामार्गावर येत असताना कल्याणीला ट्रॅक्टरने धडक दिली. यावेळी तिच्या मागेच आई वडिल आणि मुलगा होता. त्यांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली.
चाक पोटावरून गेल्याने अवघ्या काही मिनिटांत कल्याणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. वडिलांनी तिला तत्काळ दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तिची ज्योत मावळली होती. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत आई वडिल आणि लेकरासोबत असणारी, प्रेमाने भाकरी खायला घातलेली पोटची कल्याणी गतप्राण होऊन निपचिप होऊन पडलेली पाहण्याची वेळ आई वडिलांवर आली.
काय होती इन्स्टावरील शेवटची पोस्ट
कल्याणी आपल्या शेवटची ठरलेल्या पोस्टमध्ये म्हणते, काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला...मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्या साठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली... मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत..मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या..
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या