Manjili Karad VIDEO : माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला, मी मराठा असल्याने जरांगेंनी न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहन, इशाराही दिला
Santosh Deshmukh Murder Case : परळीमध्ये दोन मंत्रिपदं आली हीच त्यांची पोटदुखी आहे. यापुढे सुरेश धस, अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे यांची सगळी प्रकरणं बाहेर काढणार असा इशारा मंजिली कराड यांनी दिला.
बीड : मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखसाठी न्याय मागितला, माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला. मीदेखील मराठा आहे त्यामुळे जरांगेंनी मला न्याय द्यावा अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी केली. मस्साजोगमध्ये स्टंट केला आणि त्या स्टंटमुळे माझ्या नवऱ्याला अडकवण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला. यापुढे सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणेंच्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर काढणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर मंजिली कराड यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा असल्याने मला न्याय द्यावा, जरांगेंना आवाहन
मंजिली कराड म्हणाल्या की, जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांसाठी न्याय मागितला. संतोष देशमुख माझ्या भावासारखा आहे. पण तो एकटाच मराठा नाही. मीदेखील मराठा आहे. मला न्याय कोण देणार? आता माझ्या नवऱ्यावर अन्याय होत आहे. तुम्ही जसा मराठा समाजाचा आहे असं सांगत देशमुखांसाठी न्याय मागता तोच न्याय मला द्या.
न्यायव्यवस्था बळी पडते, मंजिली कराडांचा आरोप
वाल्मिक कराडला पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यावर बोलताना मंजिली कराड म्हणाल्या की, "फक्त एका फोन कॉलमुळे तुम्ही 302, 307 कलम, मोक्का सारखा गुन्हा कसा लावू शकता असं न्यायाधीशांनीही पोलिसांना विचारलं आहे. पण शेवटी न्यायव्यवस्था कुणाच्या तरी हातामध्ये आहे. ती कुणाच्या तरी दबावाला बळी पडली."
एका स्टंटमुळे माझा नवरा अडकला
वाल्मिक कराडवर मोक्का लावा, त्याला हत्या प्रकरणात आरोपी करा अशी मागणी करत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांनी मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. त्याचा संदर्भ देत मंजिली कराड म्हणाल्या की, "पोलिसांनी फक्त एका स्टंटमुळे माझ्या माणसाला अडवलंल आहे. यामध्ये काही कटकारस्थान केलं जातंय, माझ्या नवऱ्याला वेठीस धरला जातंय. पण त्याला कितीही अडवकला तरी सत्य काही लपणार नाही. जे काही पुरावे असतील ते समोर येतीलच."
यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर आणणार
मंजिली कराड म्हणाल्या की, "परळीमध्ये दोन मंत्रिपदं कशी असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं होतं. हीच त्यांची पोटदुखी आहे. त्यातूनच माझ्या नवऱ्याला अडकवलं आहे. एकाचं दहा करून सांगितलं आहे. त्यामुळे मी देखील हळूहळू यांच्या गोष्टी समोर आणेन. सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानीया, बजरंग सोनवणे यांनी काय काय केलं याची माहिती घेणं सुरू असून यांच्या खऱ्या गोष्टी बाहेर आणल्या जातील."
कर भरला नाही म्हणून नोटीस, ही कुठली पद्धत?
वाल्मिक कराडच्या मालकीच्या पिंपरी चिंचवडमधील एका फ्लॅटला महापालिकेने नोटीस पाठवली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मंजिली कराड म्हणाल्या की,मी त्या फ्लॅटमध्ये राहत नाही. नगरपालिकेने कराची नोटीस दिली आहे. वर्षाचा कर भरला नाही म्हणून नोटीस द्यायची ही कुठली पद्धत? फ्लॅट घेणं हे काही अवैध नाही. प्रत्येकजणाने फ्लॅट घेतला आहे. आम्ही कुणाचं काही लुबाडलं नाही. कर्ज काढून तो फ्लॅट घेतला आहे.
बीडमध्ये जो काही वाद आहे तो विरोधकांनी लावला आहे. त्यांना जातीयवाद करायचा आहे असा आरोप मंजिली कराड यांनी केला. पण आपण सुज्ञ नागरिक आहोत. राजकीय लोकांचे ऐकू नये, बंधूभावाने राहावं असंही त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे हे आमच्या घरी आलेले नाहीत. त्यासंबंधी दाखवण्यात आलेल्या सगळ्या बातम्या या पूर्ण खोट्या आहेत अशी माहिती मंजिली कराड यांनी दिली.
ही बातमी वाचा: