Jitendra Awhad on Sunil Tatkare : सुनील तटकरे जे काही बोलले, ते म्हणजे उंदराला मांजराची साक्ष, तुमच्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणून शरद पवार वाईट; आव्हाडांची टीका
तुमचं आणि माझं नातं संपून जाईल हे कोण बोलतय तटकरेंनी तपासावं, स्वतःच्या भावनिक आव्हानांवर पांघरून घालून शरद पवारांवर बोट दाखवण्याचं तटकरेंनी थांबवावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
Jitendra Awhad on Sunil Tatkare : सुनील तटकरे जे काही बोलले आहेत ते म्हणजे उंदराला मांजराची साक्ष असा प्रकार आहे. अहमद पटेल आणि पवार साहेबांमध्ये वाद झाला होता, असे वाद अनेकदा झाले, पण टोकाचे वाद झाले म्हणून फोन बंद करून गायब होणं हे त्याला उत्तर नसल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शरद पवार कधीही भावनिक आवाहन करत नाही, त्यांनी एकही वाक्य उच्चारलेलं नाही, मी परत कधी इथं येणार नाही, मी निधी देणार नाही, तुमचं आणि माझं नातं संपून जाईल हे कोण बोलतय तटकरेंनी तपासावं, स्वतःच्या भावनिक आव्हानांवर पांघरून घालून शरद पवारांवर बोट दाखवण्याचं तटकरेंनी थांबवावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
तुम्ही किती वेळा सांगितलं होतं की बीजेपीत जाऊया
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, वाद शरद पवारांचा झाला होता ना? पवार साहेबांनी बघितलं असत काय करायचं ते. तुम्हाला उलटी उडी मारायची होती त्यामुळे शरद पवारांच्या खांद्यावर हात ठेवून उडी मारली आणि कारण द्यायचं होतं की साहेबांचं भांडण झालं होतं म्हणून. तुम्ही पाच वर्ष कशाला जात होता पवार साहेबांकडे चला बीजेपीत जाऊया म्हणून? 2014 च्या अलिबागच्या बैठकीत तुम्ही काय करत होता आठवत का तुम्हाला? तुम्ही किती वेळा सांगितलं होतं की बीजेपीत जाऊया, त्यासाठीच तुम्ही अलिबागला खास बैठक बोलावली होती, असे आव्हाड म्हणाले.
त्यांनी सांगितले की, आयत्या वेळी सर्व अंगावर येत आहे, भांड फुटत आहे म्हणून कारण नसताना पवार साहेबांचं नाव घेऊ नका. त्यांनी आपली पुरोगामी भूमिका कधी सोडली नाही, तुम्ही दररोज सकाळी सात वाजता उठून कान खायला यायचे. तुम्हाला आठवत असेल पुण्यातील त्यांच्या घरात एक बैठक झाली होती, त्यावेळेला सर्व सांगत होते की आपल्याला बीजेपी सोबत नाही जायचं, आणि समोर तीन खुर्च्यांमध्ये जे बसले होते त्यांचं नाव मला घ्यायचं नाही तेव्हा आठवा तुम्ही काय सांगत होता, असेही आव्हाड यांनी सांगितले.
तुम्हाला फक्त सत्तेशी मतलब
तुमच्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणून शरद पवार वाईट करत आहेत. तुम्हाला फक्त सत्तेशी मतलब आहे. सत्तेसाठी राजकारण करायचं हा तुमचा मूळ हेतू आहे. स्वतःच्या मुलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवताना शरद पवारांनी शेकापच्या लोकांना सांगून तुमच्या मुलीला अध्यक्ष केलं हे खरं की खोटं? अशी विचारणा त्यांनी केली. शरद पवारांनी अजून कशात तुमचं नाव घेतलं नाही पण त्यांच्या मनात हे नक्की आहे की तुम्हीच अजित पवारांना चडवून शरद पवार यांचे घर तोडलं, असा आरोपही त्यांनी केला. हेच आठ जण आधीपासून भाजपसोबत जाऊया करत होते, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या