(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil on Maharashtra Future CM: महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दाव्यानं खळबळ
Jayant Patil on Maharashtra Future CM: महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Jayant Patil on Maharashtra Future CM: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या प्रचंड उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. अशातच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पायउतार होऊन राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अशी अनेक नावे चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका दाव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच (NCP) होणार असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनी आता केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
जयंत पाटील बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार, हे आता सगळ्यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल, असं मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे. जयंत पाटील यांनी कराड येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत: अमोल कोल्हे
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं होतं. शिवाय जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांना आमच्यासोबत लोकसभेत पाठवा, असं आवाहनही कोल्हे यांनी यावेळी बोलताना केलं होतं. सांगली दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते बोलत होते. अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला होता. यावर खुद्द जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं होतं.
जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमतानं चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं ते वक्तव्य प्रतीक पाटील आणि माझ्या कौतुकासाठी होतं. मात्र, उद्देश काही नाही. अजितदादा आणि माझ्यात किंवा पक्षात कोणाशीही स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी ही कार्यकर्त्यांच्या भावना आणि अमोल कोल्हे यांचे केवळ मत इथंपर्यंतच या गोष्टी मर्यादित आहेत.