(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayakwadi : जायकवाडीतून वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा दहापट जास्त पाण्याचं बाष्पीभवन; एका दिवसात पाणीसाठा एक टक्क्यांनी घटला
Jayakwadi water storage update : काही दिवस अशीच परिस्थिती असल्यास जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने घट होण्याची शक्यता आहे.
Jayakwadi water storage update : जुलै महिन्यात काही प्रमाणात चांगला पाऊस झाला असतांना, ऑगस्ट महिना जवळपास पूर्णपणे कोरडा गेला असल्याने आता मराठवाड्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे. अशातच मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी (Jayakwadi) धरणात देखील पाणी पातळी वेगाने घसरत आहे. विशेष म्हणजे उन्हाचा चटका वाढत असल्याने जायकवाडी धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. एका दिवसांत तब्बल 1.233 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पुढील काही दिवस अशीच परिस्थिती असल्यास जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने घट होण्याची शक्यता आहे.
पाऊस नसल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा 1 टक्याने घटला आहे. आज घडीला जायकवाडी धरणात 33.66 टक्के पाणीसाठा आहे. अहमदनगर, नाशिकच्या भागातून येणारी आवकही बंद आहे. तर, जायकवाडी धरणातून संभाजीनगर, जालनासह 300 गावांना पाणी पुरवठा होतो. तसेच उद्योगाला देखील पाणीपुरवठा होतो. मात्र पिण्यासाठी आणि उद्योजगासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा दहापट जास्त पाण्याचा बाष्पीभवन होत असल्याचे समोर येत आहे. कारण एका दिवसांत तब्बल 1.233 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे समोर आले आहे.
असे आहे पाण्याचे नियोजन...
- दररोज 150 एमएलडी पाणी जायकवाडीतून देण्यात येते.
- 50 एमएलडी पाणी औरंगाबादच्या ग्रामीण भागासाठी देण्यात येते.
- 22 एमएलडी पाणी जालना जिल्ह्यासाठी देण्यात येते.
- मंगळवारी दिवसभरात 1.233 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले.
- 0.32 दलघमी पाणी उद्योग आणि पिण्यासाठी देण्यात येतो.
जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती!
- धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1507.00 फूट
- धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.334 मीटर
- एकूण पाणीसाठा दलघमी : 1468.849 दलघमी
- जिवंत पाणीसाठा दलघमी : 730.343 दलघमी
- जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 33.66 टक्के
- जायकवाडी धरण बाष्पीभवन : 1.070
मागील वर्षी आजच्या दिवशीचा
- मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2118.394 दलघमी
- मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 97.58 टक्के
- जायकवाडी पाण्याची आवक क्युसेक : 00
- 1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 239.478 दलघमी
- 1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी
धरण उशाला कोरड घशाला!
पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावात पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या पैठण तालुक्यात जायकवाडी धरण आहे, त्याच पैठणमध्ये देखील काही गावांना टँकरने पुरवठा करण्यात आल्याची वेळ आली आहे. त्यामुळे धरण उशाला कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: