Jalgaon District Bank Election : अर्रर.. खडसे हे काय बोलले! जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आपल्या भाजपकडेच राहणार...
जिल्हा बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचं सांगण्याऐवजी ते भाजपकडेच राहणार असल्याचं खडसेंच्या तोंडातून चुकून गेलं.
जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपमधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असला तरी त्यांच्यातील भाजप कार्यकर्ता आजही कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडल्यानंतर अध्यक्षपद भाजपकडेच राहणार असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले. नंतर चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नाव घेतले.
गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सहकार पॅनलची बैठक अजिंठा विश्राम गृहात पार पडली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. बैठक आटोपल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीचा काय फॉर्म्युला ठरला असं पत्रकारांनी विचारले असता खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नाव घेण्याऐवजी या निवडणुकीवर बहिष्कार घातलेल्या भाजपाला तीन वर्ष अध्यक्षपद दिले जाईल असा खुलासा केला.
यावेळी खडसे यांच्याकडून बोलण्यात झालेली चूक सगळ्यांच्या लक्षात येताच मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि भाजप आजही डोक्यात असल्याच सांगितलं. नंतर एकनाथ खडसे यांनी आपण चाळीस वर्ष भाजपमधे काढली असल्याने भाजपाचे नाव येणे साहजिक आहे असं म्हटलं. यावेळी उपस्थित नेत्यांच्यामध्ये मात्र चांगलचं हसं पिकलं होतं.
या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीचा फॉर्म्युला काय ठरला हे सांगताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादी पक्षाला तीन वर्ष, शिवसेनेला दोन वर्ष असं अध्यक्षपद दिले जाणार आहे. काँग्रेस पक्षाला दोन वर्ष उपाध्यक्षपद तर सेनेला दोन वर्ष आणि राष्ट्रावादीला एक वर्ष उपाध्यक्षपद दिले जाणार असल्याचं स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या :