पाकिस्तान सुधारणार नाही, इंदिरा गांधींसारखी कणखर भूमिका घ्या, बलुचिस्तानला स्वतंत्र करत पाकचे दोन तुकडे करा : रोहित पवार
पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची आज गरज असल्याचे रोहित पवार म्हणाले.

India Pakistan war : युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. अवघ्या तीनच तासात पाकिस्तानचे खरे रंग जगासमोर आले आहेत. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच सीमावर्ती भागात गोळीबार सुरु केला आहे. पण त्यांच्या या कृतीला भारतीय सैन्य दलानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची आज गरज असल्याचे रोहित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
युद्धबंदी होऊन तीन तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने ड्रोनहल्ले करत पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल तर 1971 मध्ये ज्याप्रमाणे स्व. इंदिरा गांधीनी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता कणखर भूमिका घेत पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्याचप्रकारे बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची आज गरज आहे. सेना सज्ज आहे, सेनेवर देशाचा विश्वास आहे, सरकारने निर्णय घ्यावा, संपूर्ण देश आणि सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानने 11 ठिकाणी केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरसर राजस्थानच्या जैसलमेर, बाडमेरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु करण्यात आला आहे. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कच्छमधील सीमावर्ती भागातही पाकिस्तानचे ड्रोन दिसले आहे. श्रीनगरमध्ये स्फोटांचा आवाज आल्याची माहिती मिळाली आहे. बारमेरमध्ये एकामागोमाग ड्रोन दिसले आहेत. सीमावर्ती अनेक भागांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने 11 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. आत्तापर्यंत 9 शहरांमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर शस्त्रसंधीचं काय झालं? असा सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.
पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडलं
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुपारी शस्त्रसंधीसंदर्भात सहमती झाली होती. पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओला फोन करुन शस्त्रसंधीसाठी विनंती केली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करत असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याची सर्वात अगोदर घोषणा केली होती. शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन तासात पाकिस्ताननं पुन्हा एकदा खरा रंग दाखवत ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. एक प्रकारे पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडलं आहे.
























