Sharad Pawar : सर्व आजारांवर मात करणाऱ्या शरद पवारांच्या एनर्जीचं रहस्य काय?
Sharad Pawar : शरद पवार यांचं सध्या 81 वर्षे वय आहे. त्यांच्यासोबतचे अनेक लोक निवृत्त झाले. परंतु, कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करून आज देखील शरद पवार राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) हे देशाच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तींपैकी एक. शरद पवार यांचं सध्या 81 वर्षे वय आहे. त्यांच्यासोबतचे अनेक लोक निवृत्त झाले. परंतु, कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करून आज देखील शरद पवार राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय आहेत. महाराष्ट्रातील राजकारण तर त्यांच्याभोवतीच फिरत असतं. शिवाय राष्ट्रीय राजकारणात देखील ते सक्रिय आहेत. शरद पवार आज देखील दैनंदिन कामात सहभागी होतात. नुकतेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरी देखील रूग्णालयातून शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय शिबीराला उपस्थित राहत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या सर्वातून त्यांनी हाच संदेश दिलाय की, कसलाही आजार असला तरी शरद पवार त्याला पुरून उरणार.
31 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किमान आठवडाभर रुग्णालयात राहण्याची गरज असल्याचे सांगितले. याच दरम्यान म्हणजे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन होते. उपचार सुरू असताना शरद पवार यांनी 5 नोव्हेंबर रोजी शिबीराच्या दुसऱ्या दिवशी शिर्डीला जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्याआधी उपचार सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. यावेळी देखील मुख्यमंत्र्यांना शरद पवार म्हणाले, “मी रुग्णालयातून डिस्चार्ज घेईन आणि अधिवेशनाला उपस्थित राहीन. अशा परिस्थितीत पवार खरच शिबीराला हजेरी लावणार का? याबाबत अनेकांना शंका होती. परंतु, पवारांनी आपल्या शब्दावर ठाम राहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रूग्णालयातून ते महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवर गेले. तेथून चॉपरने ते शिर्डीला पोहोचले. तेथे काही मिनिटे कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि नंतर ते रुग्णालयात परतले. त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे आणि पक्षाप्रती असलेल्या बांधिलकीमुळेच पवार हे करू शकले, असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज घेणे हे फक्त एक किरकोळ उदाहरण आहे. 2004 मध्ये जेव्हा शरद पवार यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यावेळी ते आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकतील की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. अनेक राजकीय पंडितांनी त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीचा शेवट होईल असे अंदाज देखील वर्तवले होते. परंतु, पवार सहजासहजी हार मानायला तयार नव्हते. पवारांचे रिपोर्ट पाहिल्यानंतर एका तरुण डॉक्टरने ते सहा महिने जगू शकणार नाहीत, असे सांगितलले होते. याचवेळी “मी तुझ्यापेक्षा जास्त जगेन” असे शरद पवार त्या डॉक्टरला म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांच्या गालावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पवार यांच्या मांडीच्या कातडीचा एक भाग काढून त्यांच्या गालावर लावण्यात आला. यावेळी त्यांचे काही दात देखील काढण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात यूपीएचे सरकार आले आणि शरद पवार यांना कृषिमंत्री करण्यात आले. कर्करोगावर उपचार घेत असतानाही ते आपले कर्तव्य बजावत राहिले.
'ऑन माय टर्म्स' या त्यांच्या आत्मचरित्रात शरद पवार यांनी लिहिले आहे की, "कर्करोगाचे निदान झाल्यावर मी पहिली गोष्ट ठरवली की, मी या समस्येवर मात करण्यासाठी एक धोरण आखले पाहिजे. जीवनात काही गोष्टी अचानक, अनपेक्षितपणे घडतात, हे सांगणे एखाद्याच्या नियंत्रणाबाहेर असते. त्यांच्यावर फुशारकी मारण्यात अर्थ नाही. अशा परिस्थितीत बहुतेक लोक उदास होतात. काही जण आहे त्या परिस्थीत जगतात, परंतु, आलेल्या परिस्थितीशी मी लढत राहतो. हा लढण्याचा वारसा माला माझ्या आईकडून मिळाला आहे."
शरद पवार कॅन्सरमधून बरे होण्याच्या मार्गावर असतानाच त्यांना आणखी एका आजाराने गाठले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी हृदयात ब्लॉकेज झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर देखील अनेक वेळा त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागला. 2014 मध्ये त्यांच्या ओटीपोटाचे हाड फ्रॅक्चर झाले. मात्र, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेनंतर पंधरा दिवसांत कोणत्याही आधाराशिवाय ते चालायला लागले. मार्च 2021 मध्ये त्यांच्या पित्ताशयातील पित्ताचे खडे काढण्यासाठी त्यांची एन्डोस्कोपी रेट्रोग्रेड कोलांजियोपॅन्क्रिएटोग्राफी केली. महिनाभरानंतर पवारांना पुन्हा पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अनेक व्याधींवर मात करत शरद पवार राजकारणात आणि जामाजिक जीवनात कायमच सक्रिय राहिले. 2019 ला देखील भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि राज्यात तीन नंबरला असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेत नेहून बसवले. एवढ्या वयातही सक्रिय असल्याबद्दल त्यांचे कोणी कौतुक केले तर त्याला ते जास्त विषेश मानत नाही. आयुष्यात वय हा फक्त एक आकडा आहे हे शरद पवार यांनी अनेक वेळा आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.