Nagpur News: धन्यवाद 'देवा भाऊ' म्हणत उपराजधानीत भाजपचा जोरदार प्रचार; देवेंद्र फडणवीसांच्या नावे होर्डिंगद्वारे नवी रणनीती?
"देवेंद्र फडणवीस" उर्फ "देवा भाऊ", हेच दोन शब्द टॅगलाईन म्हणून वापरत भाजपने नागपुरसह राज्यात जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. परिणामी हा भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.
![Nagpur News: धन्यवाद 'देवा भाऊ' म्हणत उपराजधानीत भाजपचा जोरदार प्रचार; देवेंद्र फडणवीसांच्या नावे होर्डिंगद्वारे नवी रणनीती? hoarding of devendra fadnavis put up by bjp in nagpur with name of deva bhau bjp New strategy for Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Politics marathi news Nagpur News: धन्यवाद 'देवा भाऊ' म्हणत उपराजधानीत भाजपचा जोरदार प्रचार; देवेंद्र फडणवीसांच्या नावे होर्डिंगद्वारे नवी रणनीती?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/23/b445ee277f51d4c9f39dacf547d1b4ec1727086133804892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics नागपूर : "देवेंद्र फडणवीस" उर्फ "देवा भाऊ"... हेच दोन शब्द टॅगलाईन म्हणून वापरत भाजपने नागपुरात आणि राज्यात जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. आधी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी भाजपनं "देवा भाऊ" या टॅगलाईन चा वापर केलाच. आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रयत्नांनी झालेले विकास कामं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नागपुरात "देवा भाऊ" या आशयाने जोरदार प्रचार केला जात आहे. देवेंद्र फडणवीस संदर्भात नागपूरकर (Nagpur) वापरत असलेल्या या प्रेमाच्या शब्दाचा वापर भाजप विचारपूर्वक करत आहे का ? तसेच एक ब्राह्मण नेता या अनुषंगाने विरोधक देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असताना, विरोधकांचा तो हल्ला बोथट करण्यासाठी हे भाजपच्या (BJP) रणनीतीचा एक भाग आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित झाले आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या नावे होर्डिंगद्वारे भाजपची नवी रणनीती?
धन्यवाद देवा भाऊ, नागपूरला मेट्रो दिल्याबद्दल. धन्यवाद देवा भाऊ, नागपुरात एम्स रुग्णालय आणल्याबद्दल. नागपुरात आयआयएम आणि इतर शैक्षणिक संस्था सुरू केल्याबद्दल. नाग नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल. शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण केल्याबद्दल. नागपूरातील सर्व महत्त्वाचे चौक आणि प्रमुख सार्वजनिक स्थान, सर्वच ठिकाणी "देवा भाऊ" चे असेच होर्डिंग दिसून येत आहे आणि त्याद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी गेले अनेक वर्ष नागपूर शहराचे आमदार, राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला जात आहे. किंबहुना देवेंद्र फडणवीस 1999 पासून नागपुरात सलग 25 वर्ष आमदार आहेत. भाजपसाठी आणि राज्यात त्यांनी वेगवेगळे पद भूषवले आहे. त्यामुळे ते नागपूरकरांसाठी चांगलेच परिचयाचे आहेत. नागपुरात मोठ्या संख्येने सामान्य लोकं, त्यांना देवा भाऊ या नावानेच ओळखतात.
देवेंद्र फडणवीस यांना "देवाभाऊ" ही टॅगलाईन जास्त संयुक्तिक?
नागपुरातील सामान्य नागरिकांची देवेंद्र फडणवीस यांचा कनेक्ट निवडणुकीचे अनुषंगाने वापरण्यासाठीच आता भाजपने ही देवा भाऊ या टॅगलाईनसह प्रचार सुरू केला आहे. योगायोगाने राज्य सरकारच्या लाडकी बहीण या योजनेमुळे सध्या राज्यात लाडका भाऊ या शब्दाला ही तेवढीच प्रसिद्धी मिळत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यातील महिलांचे भाऊ म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत. त्यामुळे नागपुरात आधीच देवा भाऊ या नावाने सर्वांच्या परिचयाचे असलेले देवेंद्र फडणवीस यांना "देवाभाऊ" ही टॅगलाईन जास्त संयुक्तिक वाटत असल्याने भाजपने त्याच टॅग लाईन सह प्रचाराला सुरुवात केली आहे.
'देवा भाऊ' हीच प्रतिमा जास्त फायद्याची ठरेल?
गेले काही महिने खास करून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतानाही विरोधकांच्या थेट टार्गेटवर आहेत. जरी फडणवीसांना घेरण्यासाठी विरोधक त्यांच्या ब्राह्मण जातीचा थेट उल्लेख करत नसले, तरी राजकीय दृष्टिकोनातून फडणवीस या आडनावाचा वापर करून अप्रत्यक्षरीत्या तसेच प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांचा देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या जातीवरून होत असलेला हल्ला परतावून लावण्यासाठी ही भाजपला देवेंद्र फडणवीस यांची देवा भाऊ हीच प्रतिमा जास्त फायद्याची वाटत असावी, अशी शक्यता आहे. त्यामुळेच देवा भाऊ या टॅग लाईनसह भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मतदारांसमोर एका नव्या पॅकेज मध्ये प्रस्तुत करण्याचा प्रयत्न या मोहिमेतून सुरू केला असावा, अशी चर्चा आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)