(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli News : हिंगोलीच्या नागनाथ मंदिर परिसरातील लोखंडी गेट पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
Hingoli News : औंढा नागनाथ शहरातील नागनाथ मंदिराच्या परिसरातील लोखंडी गेट पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
Hingoli News : हिंगोलीत (Hingoli) एक दुर्दैवी घटना समोर आली असून, औंढा नागनाथ शहरातील नागनाथ मंदिराच्या परिसरातील लोखंडी गेट पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या मंदिराच्या पूर्व द्वारामोरील पत्राच्या शेडला एका लोखंडी गेट लावण्यात आलेला आहे. दरम्यान हाच गेट अंगावर पडून एका बारा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सोमनाथ अरुण पवार (वय 12 वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे.
औंढा नागनाथ शहरातील नागनाथ मंदिराच्या परिसरातील पूर्व द्वार गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविक जात नाहीत. मात्र परिसरातील काही लहान मुले या ठिकाणी खेळत असतात. दरम्यान आज सकाळी देखील याच ठिकाणी सोमनाथ खेळत होता. मात्र अचानक लोखंडी गेट त्यांच्या अंगावर पडला. ज्यात तो दबला गेला. याबाबतची माहिती त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी तात्काळ परिसरातील नागरिकांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अवजड गेट उचलून सोमनाथला बाहेर काढले. तर याची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. मात्र, अवजड लोखंडी गेट उचलेपर्यंत खाली दबून सोमनाथ याचा जागीच मृत्यू झाला होता. तर मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश...
नागनाथ मंदिराच्या परिसरातील खेळताना सोमनाथच्या अंगावर लोखंडी गेट पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान सोमनाथच्या अंगावर गेट पडल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान सोमनाथला गेटच्याखाली दबलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी टाहो फोडला. सर्वत्र आक्रोश सुरु झाला. मोठ्या परिश्रमाने गेट बाजूला काढण्यात आला. मात्र, तोपर्यंत सोमनाथचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
अन् एकच धावपळ उडाली...
औंढा नागनाथ शहरातील नागनाथ मंदिराच्या परिसरातील पूर्व द्वार बंद असल्याने, नेहमीप्रमाणे याठिकाणी काही लहान मुलं खेळत होते. मात्र, अचानक हा लोखंडी गेट जोरात आदळला. ज्यात सोमनाथ या गेटच्या खाली दबला. दरम्यान याची माहिती मिळताच परिसरात एकच धावपळ उडाली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र लोखंडी गेट अवजड असल्याने त्याला उचलणे एवढ सोपं नव्हते. त्यामुळे शेवटी मोठ्याप्रमणात नागरिक जमा झाले आणि त्यांच्या मदतीने गेट बाजूला करण्यात आला. मात्र, तोपर्यंत सोमनाथचा मृत्यू झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या: