Hingoli News : नांदेडमधून तडीपार केल्यावर दरोड्यासाठी हिंगोलीत पोहोचले; पण पोलिसांना टीप मिळाली अन् गेम फसला
Hingoli News : तडीपार आरोपीला त्याच्या साथीदारांसह दरोडयाचे तयारीत असतांना गावठी पिस्टल व खंजिरासह ताब्यात घेतले आहे.
Hingoli News : हिंगोली (Hingoli) पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून, नांदेड (Nanded) येथील गंभीर गुन्ह्यातील तडीपार आरोपीला त्याच्या साथीदारांसह दरोड्याच्या तयारीत असतांना गावठी पिस्टल आणि खंजिरासह ताब्यात घेतले आहे. हिंगोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. यावेळी 5 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गणेश भुजंगराव मोरे (वय 21 वर्ष, रा. शाहू नगर हडको नांदेड), वासूदेव मारोती चोंढीकर (वय 23 वर्ष, बस स्टॉप जवळ हडको नांदेड), बुध्दभूषण भगवान खिल्लारे (वय 19 वर्ष रा. शाहू नगर हिंगोली), संदीप अंबादास कुहीरे (वय 24 वर्ष, रा. जिल्हा परीषद वसाहत हिंगोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील गुन्ह्यांना आळा घालण्याचे तसेच बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली. 22 जुलै रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेत काही लोकं अंधारात दबा धरून बसले आहेत. तसेच ते मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. तर त्यांच्यासोबत एक स्वीप्ट डीझायर चारचाकी (वाहन एम. एच. 47 वाय 4130) गाडी देखील असल्याची माहिती पथकाला मिळाली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचं एक पथक मिळालेल्या ठिकाणी तात्काळ पोहचले. यावेळी रेल्वे स्टेशनचे बाजूला मालगाडी रॅकजवळ एक स्विफ्ट डिझायर कार दिसून आली. तसेच, हनुमान मंदिराजवळ सरस्वती नगरमध्ये मोकळ्या जागेत काही इसम लपलेले दिसून आले. या सर्व लोकांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पथकाने त्या लोकांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. याचवेळी यातील एकजण पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. मात्र, यावेळी गणेश मोरे, वासूदेव चोंढीकर, बुध्दभूषण खिल्लारे, संदीप कुहीरे यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्टल (मॅक्झीनसह), 6 एम. एम. चे. 4 राऊन्ड, दोन खंजीर, एक लोखंडी गोलाकार गज, एका प्लास्टिक पिशवीमध्ये मिरची पावडर, एक दोरी अंदाजे 10 फूट लांब असा एकूण 5 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल...
दरम्यान, या सर्व आरोपींनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते दरोडा घालण्याच्या तयारीत होते. तसेच त्यांच्याकडे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य देखील सापडले आहे. त्यामुळे या सर्व आरोपींच्या विरोधात हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. पंडीत कच्छवे, पोउपनि विक्रम विठुबोने पोलीस अंमलदार सुनिल अंभोरे, प्रेम चव्हाण, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले स्था. गु.शा. हिंगोली यांच्या पथकाने केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :