High Court : नायलॉन मांजा विक्री प्रकरणी नागपूर खंडपीठाची फेसबुकला नोटीस; बुधवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश
नायलॉन मांजा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेल्या समितीने 11 जानेवारी पूर्वी बैठक घेत काय-काय उपाययोजना करता येतील याची आखणी करावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.
Nagpur News : बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी फेसबुक इंडिया (Facebook India) ऑनलाईन सर्व्हिस प्रा. लि.ला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Bombay High Court Nagpur Bench) नोटीस बजावली आहे. तसेच येत्या बुधवार (ता. 11) पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या जीवितहानी आणि घडणाऱ्या घटनांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान काही पोर्टलवर ऑनलाईन नायलॉन मांजाची विक्री सुरु असून त्याची जाहिरातही केली जात असल्याची माहिती न्यायालयीन मित्रांनी न्यायालयाला दिली. त्यानुसार, फेसबुकच्या अखत्यारित येणाऱ्या फेसबुक इंडिया ऑनलाईन सर्व्हिस प्रा. लि. मुंबई व इंडिया मार्ट इंटर मेश लि. दिल्ली या दोन कंपन्यांना न्यायालयाने नोटीस बजावली. तसेच, पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (ग्रामीण) यांनी (Nagpur Police) जिल्ह्यातील नायलॉन मांजा विक्रीला आळा बसावा म्हणून काय काय उपाययोजना केल्या, याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
नायलॉन मांजा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेल्या समितीने 11 जानेवारीपूर्वी बैठक घेत येणाऱ्या संक्रांत सणासाठी काय-काय उपाययोजना करता येतील याची आखणी करावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी निश्चित केली. न्यायालय मित्र म्हणून देवेन चव्हाण यांनी, महापालिकेतर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.
दीड लाखाचे साहित्य जप्त
हुडकेश्वर पोलिसांनी नरसाळा गावात धाड घालून एक लाख 48 हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. यामध्ये 186 मांजाच्या चकऱ्या आहेत. प्रतिबंध असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा येत आहे. मात्र, पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असून तुरळक कारवाई होत असल्याने विक्रेत्यांचे फावले आहे. नायलॉन मांजामुळे एकाची हौस तर दुसऱ्याचा गळा कापला जातो. मागच्या वर्षी नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे कापले गेले. तरीही नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी धाड घालून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला. विक्री करणारे आरोपी अभिजित बोंडे (वय 27) रा. नरसाळा, रियाझ खान अब्दुल रशीद खान (वय 34) रा. आदर्शनगर मोठा ताजबाग, मनीष गोल्हर (वय 28) रा. हुडकेश्वर रोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा मांजा ऑटोतून आणण्यात आला होता. पोलिसांनी ऑटो सुद्धा जप्त केला आहे.
ही बातमी देखील वाचा...