(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : हेमंत पाटील समर्थक आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर राडा, जोरदार घोषणाबाजी
Lok Sabha Election 2024 : हेमंत पाटील यांच्यावर अन्याय झाल्यास तो सहन करणार नाही, त्यांना उमेदवारी मिळायलाच हवी अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
मुंबई : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील (Hingoli Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) तथा शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमेदवारी बदलली जाण्याच्या हालचाली सुरु असल्याने हेमंत पाटील समर्थक आक्रमक (Supporter) झाले आहेत. हेमंत पाटील यांच्या समर्थनार्थ मध्यरात्री कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंगल्याबाहेर राडा केला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत वर्षा बंगल्याबाहेर (Varsha Bungalow) ठिय्या आंदोलन केले. यावेळी हेमंत पाटील आणि मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुमारे अर्धा ते पाऊण तास कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेमंत पाटील यांच्यावर अन्याय झाल्यास तो सहन करणार नाही, त्यांना उमेदवारी मिळायलाच हवी अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत होते. तर, हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे हे अन्याय करणार नाहीत, उद्या सकारात्मक निर्णय येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता महायुतीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा देखील तिढा वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचा प्रचंड विरोध...
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. भाजपच्या आढावा बैठकीत देखील यावरून प्रचंड गोंधळ झाला. हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नसल्याची थेट भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांना वाढता विरोध पाहता त्यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.
हेमंत पाटील थेट मुंबईत...
हेमंत पाटील यांना स्थानिक भाजप नेत्यांचा प्रचंड विरोध होत असल्याने याची दखल महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी फडणवीसांची भेट घेऊन हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या. याची माहिती मिळताच हेमंत पाटील 200 ते 300 गाड्या घेऊन आपल्या समर्थकांसह थेट मुंबईत पोहोचले. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, याचवेळी त्यांच्या समर्थकांनी वर्षा बंगल्याच्या बाहेर प्रचंड राडा केला. हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करू नये म्हणून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीबाबत नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :