(Source: ECI/ABP News/ABP Majha)
H3N2 Influenza : काळजी घ्या! राज्यात एच3एन2च्या 352 रुग्णांची नोंद, रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचना; आरोग्यमंत्र्यांची माहिती
एच3एन2 दोन दिवसात बरा होतो. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. अंगावर आजार काढू नका, खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.
मुंबई : राज्यात एच3एन2चा (H3N2) प्रादुर्भाव वाढल्याचं समोर आले आहेत. राज्यात एच3एन2 च्या 352 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली आहे. एच3एन2च्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती सावंतांनी दिली आहे.
12 मार्चला मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात 352 रुग्णांची नोंद झाली आहे. एच3एन2 दोन दिवसात बरा होतो. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. अंगावर आजार काढू नका, खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.
अहमदनगरमधील तरुणाचा मृत्यू इन्फ्ल्यूएंझामुळे की कोरोनामुळे?
सध्या देशात एच थ्री एन टू या विषाणूचा फैलाव वेगानं होतोय. दरम्यान अहमदनगरमध्ये एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणाला इन्फ्लूएंझाची लागण झाली होती. सोबतच त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. अचानक तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हा इन्फ्लूएंझामुळे झाला की कोरोनामुळे हे तपासणीनंतरच कळणार आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर प्रशासनाची यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं चित्र सध्या निर्माण झाले आहे.
नागपुरात 'एच3एन2' विषाणूमुळे 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा संशय
उपराजधानी नागपुरात इन्फ्ल्यूएन्झामुळे 78 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. मृत व्यक्तीची मृत्यूपूर्वी केलेली 'एच3एन2' ची तपासणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र अहवालानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. रुग्णाला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी), मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या सहव्याधी देखील होत्या. बुधवारी त्यासंदर्भात ‘डेथ ऑडिट’ होणार असून त्यासाठीची समिती त्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे... त्यानंतरच सदर मृत्यू एच 3 एन 2 चा मृत्यू म्हणून नोंद होणार आहे.
मास्क वापरण्याचे आवाहन
कोरोनापासून सुटका झाली असली तरीही आता H3N2 या नवीन व्हायरसने सर्वांची चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे हा व्हायरस झपाट्याने पसरत असून लोकांमध्ये दहशत दिसून येत आहे. केंद्र सरकार सतर्क झाले असून, सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर केल्या आहेत. ज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे.