Gunaratna Sadavarte : सदावर्ते यांचं लक्ष्य आता 'एसटी बँक', निवडणुकीत पॅनेल उभं करत देणार राष्ट्रवादीला शह
अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आता सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असून एसटी बँकेच्या निवडणुकीत (ST Bank Election) आपले उमेदवार उभं करण्यासाठी त्यांनी हालचाल सुरू केली आहे.
मुंबई: अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) जेलमधून बाहेर आल्यावर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा उभारणार की आणखी दुसऱ्या पर्यायाचा वापर करणार याची उत्सुकता होती. याचं उत्तर आता मिळालं आहे.
अॅड गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिलला जेलमधून बाहेर आले. त्यानंतर ते पुन्हा जोशाने सरकारविरोधात भूमिका घेणार हे त्यांच्या वागण्यावरुन स्पष्ट झालं होतं. मात्र ही भूमिका ते आंदोलनातून मांडणार की नवी राजकीय कारकीर्द सुरु करणार हे मात्र स्पष्ट नव्हतं. गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहेत. सदाववर्ते हे एसटी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करणार आहेत. तशी तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे.
एसटी बँकेचे राज्यात तब्बल 90 हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकले असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार नक्कीच वेगळी जादू करतील अशी शक्यता वर्तवली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी संपात सहभागी असताना कायम आपल्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच ठेवलं होतं. शिवाय शरद पवार यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान केलं, जाणीवपूर्वक तेच विलिनीकरण टाळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेताना सदावर्ते दिसणार आहेत.
तब्बल दोन हजार कोटींहून अधिक ठेवी असलेल्या एसटी बँकेच्या राज्यात 50 शाखा आहेत. सध्या या बँकेचे 90 हजार सदस्य आहेत. मात्र मागच्या सहा महिन्यांच्या कालावधीत संपकऱ्यांना पगार मिळालेला नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना कर्जाचे हप्ते फेडणे शक्य झालेलं नाही. त्यामुळे सहकारी संस्था अधिनियमानुसार थकबाकीदारांना मतदानाचा अधिकार नाही. असे तब्बल 60 हजार कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हीच बाब लक्षात घेत सध्या एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी बँकेची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक प्राधिकरणाला केलीय. सभासदांना मतदान करता येणार नसल्यानं एसटी बँकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणुका जरी पुढे जाण्याची शक्यता असली तरी सदावर्ते यांच्या आगामी रणनीतीवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. आम्ही कोणत्याही संघटनेशी संबंधित नाही किंवा आम्ही निवडणुका लढवणार नाही असं म्हणणारे सदावर्ते नेमकं कुणाच्या सांगण्यावरून, कशासाठी संघटना काढत आहेत असा सवाल उपस्थित केला आहे.
दोन हजार कोटींहून अधिक ठेवी असलेल्या बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहिला मिळते. आतापर्यंत राष्ट्रवादी पुरस्कृत बँकेवर गुणरत्न सदावर्ते यांची संघटना कितपत प्रभाव पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
संबंधित बातमी: