संजय राऊतांच्या 'त्या' भूमिकेला शिंदे गटातील मंत्र्याचा पाठिंबा; म्हणाले, पक्ष बाजूला ठेवून...
गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिकेला मी पाठिंबा देतो, असं त्यांनी म्हटलं आहे. पहिले राज्य मग राष्ट्र हे उद्दिष्ट असलं पाहिजे.
Gulabrao Patil on Sanjay Raut : महाराष्ट्रातील चाळीसगाव हे कर्नाटकात मध्ये घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रश्नासाठी सर्व पक्षांनी एकत्रित आला पाहिजे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. या वक्तव्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आज जळगावात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिकेला मी पाठिंबा देतो, असं त्यांनी म्हटलं आहे. पहिले राज्य मग राष्ट्र हे उद्दिष्ट असलं पाहिजे. हे राज्य टिकवण्यासाठी अनेकांना आहुती दिली आहे. राज्यासाठी सर्वांनी आपला पक्ष बाजूला ठेवून एकत्र आला पाहिजे, असेही मत व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. आधी राष्ट्र, राज्य मग पक्ष. संजय राऊतांची ही भूमिका असेल तर त्यांना पाठिंबा आहे. बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांनीही यासाठी काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही काल स्पष्ट केलं आहे की, एकही महाराष्ट्रातलं गाव हे कर्नाटकात जाणार नाही, राज्याकरता पक्ष बाजूला सारला पाहिजे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
अजित पवारांच्या वक्तव्यावर उपहासात्मक टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे 40 रेडे गुवाहाटीला जात असल्याची टीका केली होती. याच टीकेवरून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आमदारांना रेडे म्हणत आमचे 40 रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात असल्याचं म्हटलं आहे. भाजप शिंदे गटाची जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मेळावा पार पडला या मेळाव्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला जाणार नसल्याचे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे.
पाटील म्हणाले की, निवडणूक असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली असून त्यामुळे मी गुवाहाटीला जाणार नसून आमचे बाकीचे आमदार जाणार असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांसह 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उपहासात्मक टोला लगावला आहे.
राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यावर काय म्हणाले...
गुलाबराव पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येकाने अभ्यास करून बोललं पाहिजे. महामहीम राष्ट्रपती असो की राज्यपाल असोत. राजे राजे आहेत. त्यामुळे राजांवर कोणी बोलू नये असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर टीका केली.
ही बातमी देखील वाचा